Breaking News

‘आत्मा मालिक’च्या दिंडीने भक्तीचा मळा! चैत्र महोत्सवाला भक्तांची अलोट गर्दी


कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्यातील आत्मा मालिक ध्यानपिठात आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय चैत्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाच्या सांगतेचे खास आकर्षण ठरले, ते आत्मा मालिक या ध्यानपीठाच्या आत्मप्रेमींच्या दिंडीचे. या दिंडीमुळे कोपरगाव शहरात भक्तीचा मळा फुलल्याची जाणीव प्रत्येकाला होत होती.

हजारो भाविकांसमवेत सजवलेल्या रथामध्ये संतगण व प. पू. ‘आत्मा मालिक’ माऊली यांची भव्य मिरवणूक कोपरगाव शहरातून काढण्यात आली. आकर्षक सजवलेले घोडे, उंट, बैलगाडी आदींसह नायगाव सत्संग मंडळाने कोळी समाजाची वेशभूषा केली होती. पुण्याच्या सत्संग मंडळाने खास पुणेरी पगडी घातल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. येवला तालुक्यातील पुरणगावच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, बँड पथक, शिंगे, तुतारींसह इतर वाद्यांच्या तालावर देश विदेशातील हजारो भाविकांनी ठेका धरला. शहरामध्ये रस्त्यावर सडा टाकून रांगोळया काढण्यात येऊन दिंडीचे स्वागत झाले. भाविकांनी प. पू. आत्मा मालिक माऊली यांच्या वाहनवर पुष्पवृष्टी करूत दर्शन घेतले. 

ही दिंडी दुपारी तीन वाजता आत्मा मालिक ध्यानपिठापासून निघाली. कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्याने मार्गक्रमण करीत पुन्हा ध्यानपिठ परिसरात आली. शालेय विद्यार्थ्यांनी विविध देवदेवतांची वेशभूषा धारण करून ‘सबका मालिक आत्मा आहे’ हा संदेश दिला. या विद्यार्थ्यांना सजवलेल्या रथात बसविण्यात आले होते. भाविकांनी पारंपारिक वेषभूषा परिधान केल्याने या दिंडीचे आकर्षण वाढविले होते. विदेशातील भविकांनी हातात भगवा झेंडा घेऊन भक्तिमय गीतांवर नृत्य करीत फुगडया खेळल्या. ‘आत्मा मालिक’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता. सांयकाळी आत्मरूप प्रतिमेच्या पुजनानंतर या दिंडीचे रूपांतर ध्यानपिठातील सत्संगात झाले.

यावेळी संत परमानंद महाराज यांनी उपस्थित भाविकांना चैत्र महोत्सवाचे महत्व व ध्यानपिठातील विविध कार्यक्रमासंदर्भात प्रबोधन केले. रात्री १० ते १२ या दरम्यान आळंदी पुण्याचे बाल संगीतकार सोहम गोराणे व चैतन्य देवढे यांचा संगीतमय भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. चौथीत शिकणारा सोहम गोराणे याने यावेळी वेगवेगळे १६ प्रकारची वाद्ये वाजवून उपस्थित संतासह भाविकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या कलेला सर्वांनी दाद दिली. बालकलाकार सोहम व चैतन्य यांचा संत परमानंद महाराज व देवानंद महाराज यांनी आत्मरूपाची प्रतिमा देऊन गौरविण्यात केले. यावेळी ज्योती गोराणे, ज्ञानेवर देवढे यांनी भक्ती गिते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. दरम्यान, धर्माचार्य शंकरराव शेवाळे महाराज यांच्या काल्याच्या किर्तन रात्री १ ते ३ वाजेपर्यंत सुरू होते. काल्याचे किर्तन व आत्मरूपाच्या प्रतिमेच्या पुजनेने तीन दिवसीय चैत्र महोत्सवाची सांगता करण्यात आली. 

विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात चैत्र महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना तीन दिवस महाप्रसादात मिष्टान्न भोजन देण्याची व्यवस्था आश्रमाचे विश्वस्त प्रकाश भट व बाळासाहेब गोर्डे यांनी केली होती. दररोज हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. 

पवित्र चैत्र महोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, माजीमंत्री मधुकरराव पिचड, अण्णासाहेब म्हस्के, मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी आ. दिलीप मोहिते पाटील आदींसह विविध क्षेत्रातील पदाधिकार्यांनी यांनी भेटी देऊन दर्शन घेतले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, कोषाध्यक्ष विठठलराव होन, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त, वसंतराव आव्हाड, माधवराव देशमुख, प्रभाकर जमधडे, विष्णुपंत पवार, उमेश जाधव, उदय शिंदे, कमल पिचड, आबासाहेब थोरात, सुरेखा मोहीते यांनी प्रयत्न केले. 

चैत्र महोत्सवासाठी शैक्षणिक विभागाचे प्राचार्य विभाग प्रमुख, आश्रमाचे व्यवस्थापक हिरामण कोल्हे, विश्वास बारवकर, विजय पाटील, नितीन शिंदे, भगवान सुर्यवंशी, भगवान शेळके, किशोर कटारे, निवृत्ती गायकवाड, साहेबराव गाडे, योगेश गायके, आशिष रूणवाल, पराग धुमाळ, सुरेश शिंदे, श्रीकांत बोऱ्हाडे, सुनिल पोकळे, भगवान ढगे, मिरा पटेल या विविध विभागाच्या प्रमुखांसह शिक्षक, इतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि भक्तांनी  परिश्रम घेतले.