Breaking News

वादळी पावसामुळे युटेक शुगरचे नुकसान

संगमनेर/प्रतिनिधी - तालुक्यातील कौठे मलकापूर येथे झालेल्या वादळी पावसामुळे येथील युटेक साखर कारखान्याचे जवळपास २५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. यादरम्यान वीज पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. याशिवाय वादळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी {दि. १७ } दुपारी पठार भागातील कौठे कमळेश्वरसह अन्य काही भागात जोरदार वादळ आले. त्यानंतर पडलेल्या जोरदार गारपिटीमुळे सर्वांची धावपळ उडाली. प्रशासकीय यंत्रणा पठार भागात पोहोचली असून तेथे त्यांनी नुकसानीची पाहणी सुरु केल्याची माहिती मिळाली. मलकापूर येथील युटेक साखर कारखान्याची साखर पाऊसाने भिजली असून कारखान्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारखान्याचे कॉलम वादळाने उन्मळून पडले. वीजेचे खांब वाकले, छतावरील पत्रे उडाले. हॉपरचे नुकसान झाले. साखर ठेवण्यासाठी बांधलेल्या तात्पुरत्या गोडाऊननेदेखील फार काळ तग धरला नाही. 

कौठे मलकापुरसह बिरेवाडी, साकूर, वरुडीपठार, डोळासणे येथेदेखील पाऊसाने मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तालुक्यातील चिंचेवाडी येथील महिला वादळी पाऊसामुळे घराबाहेर असलेला शेतमाल झाकण्यासाठी बाहेर पडली असता तिच्या अंगावर वीज पडून ती गंभीर जखमी झाली. पमा ताऊजी बिचकुले असे या महिलेचे नाव आहे. तिच्यावर संगमनेरात उपचार सुरु आहेत.