सेवाभावाने व्यवसाय केल्यास भरभराट : शर्मा
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटीची गरज असते. एसपीजे व्यवसाय व समाजसेवेचा एक ब्रॅण्डनेम तयार होणार आहे. आज स्पर्धेच्या युगात शाररीक तंदुरुस्तीची गरज आहे. जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीकोनाने त्याचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यवसाय सेवाभावाने केल्यास त्यामध्ये भरभराट होते, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले.
ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राला नवीन चालना देऊन सुदृढ आरोग्याची नवीन संकल्पना घेऊन दाखल झालेल्या ‘एसपीजे’ या कंपनीचे जिल्हा पोलिस अधिक्षक शर्मा यांच्या हस्ते हॉटेल आयरिश येथे थाटात उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नरेंद्र फिरोदिया, भारतीय बॅडमिंटन कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक जे. बी. एस. विद्याधर, एसपीजेचे संचालक संदिप जोशी, गौतम जायभाय, स्वप्नाली जांभे, सोमनाथ रोकडे, योगेश खरपुडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून, दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान, उपस्थितांना वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पुस्तके भेट देण्यात आली. प्रारंभी संदिप जोशी यांनी प्रास्ताविक केले.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, शहरात क्रिडा क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘मॅक्सीमस’च्या माध्यमातून कार्य सुरु आहे. एसपीजेचीदेखील त्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी शहरात फिटनेस संस्कृती रुजवली जाणार आहे. मॅरेथॉन सुरु होण्यामागे संदिप जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या चळवळीच्या माध्यमातून अनेक रनर्स घडले आहेत. शहरात विविध खेळातील नवोदित खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची अॅकॅडमी सुरु करणार आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.