खंडेराय महाराज यात्रौत्सवाला उत्साहात प्रारंभ
राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री. खंडेराय महाराज यात्रौत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मुळामाईच्या तीराजवळील परिसर यात्रेकरू व भाविकभक्तांच्या मांदियाळीने भरुन गेला आहे. सलग चार दिवस हा यात्रौत्सव सुरु राहणार आहे. यानिमित्त गावोगावचे नातेवाईक आणि भाविक राहुरीत येणार आहेत. परिणामी या चार दिवसांच्या कालावधीत खरेदी विक्रीच्या माध्यमातून राहुरीत मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे.
आज {दि. १} सकाळी ९ वा. पुणतांबा येथून कावड्यांनी आणलेल्या गंगाजल व कावड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्टेशनरोड, शनिचौक, शिवाजी चौक, जुनीपेठमार्गे शुक्लेश्वर चौक येथून कानिफनाथ चौकात व तेथून पुढे नगर मनमाड राज्य मार्गावर ही मिरवणूक आली. ठिकठिकाणी कावड्यांचे स्वागत करण्यात येत होते. ‘येळकोट येळकोट जयमल्हार’च्या जयघोषाने परिसर निनादला होता. कावड्यांची मिरवणूक मंदिराजवळ आली असता यात्रा कमेटीने स्वागत करुन कावड्यांनी श्री. खंडेराय मंदिरात प्रवेश करत देवाला जलाभिषेक केला. भंडा-याच्या उधळणीने आसमंत शोभून दिसत होता. यानंतर कावड्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर दर्शन रांगेत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
मंदिर परिसरात पहाटेपासून मंदिरात पुजाअर्चा व इतर धार्मिक कार्यक्रम सुरु होते. मुळामाईच्या तीराजवळ रहाटपाळणे व इतर करमुणुकीची दुकाने फुलली आहेत. नगर मनमाड राज्यामार्गाच्या दुतर्फा व्यावसायिक दुकाने थाटली गेली आहेत. यात्रा भरत असलेल्या संपूर्ण परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून बंदोबस्तासाठी चौकी व मनोरे उभारण्यात आले आहेत. यात्रा कमेटीच्यावतीने संपूर्ण परिसरात देखभाल केली जात आहे.
सायंकाळी पाच वा. परंपरेनुसार बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. देवाचे भगत दामोदर शेटे यांनी कमरेला दोर बांधून गाड्या ओढल्या. यावेळी नगर मनमाड राज्य मार्गावर दुतर्फा बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. रात्री देवाची पालखी व छबिना मिरवणूक शहराच्या मुख्यपेठातून निघणार आहे. मंदिर परिसरात शोभेची दारुकाम झाले. यामुळे आसमंत प्रकाशाने झळाळून निघाला. येथेही भाविकभक्तांनी आवर्जून हजेरी लावली. सोमवारी {दि. २ } हजे-या होऊन सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचे भव्य मैदान भरवले जाणार आहे. राज्यभरातील नामवंत मल्ल येथे हजेरी लावणार आहेत.
यात्रा कमेटी अध्यक्ष सुरेश शेटे, उपाध्यक्ष गोरख चव्हाण, दिलीप राका, राजेंद्र वाडेकर, आतिक बागवान, आबा भुजाडी, प्रदीप भुजाडी, नरेंद्र शिंदे आदींसह अन्य पदाधिकारी यात्रौत्सव शांततेत व उत्साहात संपन्न करण्यासाठी मेहनत घेत आहेत.