वाढत्या तापमानाचा पिकांना बसतोय चटका!
कोपरगाव तालुक्यात हल्ली सरासरी ३६ ते ३७ अंश सेल्सियस तापमान असते. उशिराने झालेल्या कांदा लागवडी, फळबागांना, ऊसाला वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. सध्या विहीरीतील पाणी तळ गाठायला लागले आहे. पिके जगविणे कठीण झाले असून गोदावरी कालव्यांनाही उशिरानेच आवर्तन सोडण्यात आल्यामुळे या सिंचनाचा करपलेल्या कांद्यांना फारसा लाभ होणार नाही. त्यात जलद कालव्याचे आवर्तन आजूनही निश्चित नसल्याने शेतकऱ्यांचा चेहरा काळवंडला आहे. उभी पिके अजून पुढील दोन महिने तग धरुन ठेवणे ही तारेवरची मोठी कसरत ठरणार आहे. दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. पुढील दोन महिने पाणी समस्या तीव्रतेने जाणवणार असल्याचे संकेत मिळत असून याची मोठी झळ पशुपालन व्यवसायाला बसणार आहे.