Breaking News

सरकारकडून बघ्याची भूमिका : शरद पवार

मुंबई : काश्मीरमधील कठुआ आणि उत्तरप्रदेशातील उन्नाव या ठिकाणी झालेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बलात्कारासारख्या गंभीर घटनांमध्ये आरोपी कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा आहे हे सरकारी यंत्रणांनी पाहायचे नसते. यावर कडक कारवाई अपेक्षित आहे. उत्तरप्रदेशात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बघ्याची भूमिका घेऊ नये. दोषींवर कारवाई करून त्यांनी जनतेला योग्य संदेश दिला पाहिजे, असेही पवार म्हणाले. काश्मीर खोर्‍यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय चिंताजनक आहे. ही घटना ज्या काश्मीरमध्ये घडली, तो भाग अतिशय अस्वस्थ आहे. सरकारने जर बघ्याची भूमिका घेतली तर लोकांमध्ये रोष वाढेल आणि देशासाठी हे घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उत्तरप्रदेशात बलात्काराच्या घटनेत भाजपचा लोकप्रतिनिधी मुख्य आरोपी आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे तिथल्या राजकीय इच्छाशक्तीचे रूप उघड झाल्याची टीकाही पवार यांनी केली. या प्रकरणात तपास यंत्रणांना बळ आणि संबंधित कुटुंबाला संरक्षण दिले पाहिजे. उद्या त्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा घटनांमधून देशातल्या नागरिकांना विश्‍वास वाटेल असे वातावरण तयार करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण, सरकार या जबाबदारीतून पळ काढत असल्याचे चित्र दिसतेय, असेही पवार म्हणाले.