Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांचे लोकार्पण

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांचे दिल्लीतील निवासस्थान असणार्‍या 26 अलीपूर रोड इथे हे स्मारक उभारण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना, राज्यघटनेच्या निर्मितीची कहाणी, त्यांच्या वापरातल्या महत्वाच्या वस्तू, दुर्मिळ पुस्तके असा मोठा संग्रह या स्मारकात ठेवण्यात आला आहे. सर्व राज्यघटना डिजीटल स्वरूपात इथे साकारण्यात आली आहे. अशा प्रकारचे देशातले हे पहिलच स्मारक आहे. या स्मारकाचे वास्तुशिल्पही अनोखं असून संविधानाच्या पुस्तकाच्या स्वरूपात त्याच्या दर्शनी भागाची मांडणी करण्यात आली आहे. तर त्याच्या द्वारावर सांचिच्या स्तुपाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या स्मारकात असलेल्या वाचनालयात पुस्तकांचा खजिनाच असून बाबासाहेबांवरच्या पुस्तकांचा संग्रह ठेवण्यात आला आहे. अलिपूर रोडवरच्या कार्यक्रमस्थळी येण्यासाठी पंतप्रधानांनी मेट्रोचा वापर करत कार्यक्रम स्थळी येणे पसंत केले. या स्मारकाच्या निर्मितीमध्ये पंतप्रधानांनी खास लक्षं घातल्याची माहिती सूत्रांनी दिली.