Breaking News

स्वच्छतेच्या संस्कृतीची सुरुवात स्वत:पासूनच करावी : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी - शहरातील नागरिकांना आरओ फिल्टरचे पाणी देण्याचा हा उपक्रम खूप चांगला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून अत्यंत चांगले सुरु आहे. ‘स्वच्छ सर्व्हेक्षण’ अंतर्गत शहरात स्वच्छतेचे काम चांगले सुरु असून शहरातील नागरिकांना स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली आहे. स्वच्छता ही मानवी जीवनाची संस्कृती आणि प्रणाली झाली पाहिजे, त्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी, असे प्रतिपादन माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.

नगरपरिषद आणि प्रथमेश एंटरप्राईजेस नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नागरिकांसाठी जीवनधारा जलतृप्ती योजना केंद्राचा शुभारंभ राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते जनतानगर येथे नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. 

विधान परिषद सदस्य आ. डॉ. सुधीर तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, नूरमहंमद शेख, विश्‍वास मुर्तडक आदींसह नगरसेवक, नगरसेविका, प्रथमेश एंटरप्राईजेसचे संचालक हरीष जैन, गणेश जाधव, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी उपस्थित होते. काँग्रेसनेते आ. थोरात आणि आ. डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे शहरात सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून नगराध्यक्षा तांबे यांच्या संकल्पनेतून शहरातील नागरिकांना शुध्द पाणी अत्यंत अल्पदरात मिळण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला.

नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, शिक्षण, संस्कृतीने सहकाराने समृध्द असलेल्या संगमनेर शहरात शिक्षणाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थी तसेच व्यापारासाठी इतर गावातून अनेक नागरिक येत असतात. पूर्वीच्या काळी रांजणांच्या माध्यमातून अनेक पाणपोई करण्यात येत असत. त्याच धर्तीवर शुद्ध पाण्याच्या पाणपोई शहरात अनेक ठिकाणी करण्यात येत आहेत. प्रथमेश एंटरप्राईजेसचे संचालक हरीष जैन यांनी या योजनेची माहिती सांगितली.

यावेळी नगरसेवक दिलीप पुंड, किशोर पवार, किशोर टोकसे, आसीफ देशमुख, रुपाली औटी, मनिषा भळगट, शैलेश कलंत्री, नितीन अभंग, माजी नगरसेविका चंद्रलेखा काकडे, मिलिंद औटी, केशवराव मुर्तडक, सतिषराव कानवडे, सतिष खंडेलवाल आदी उपस्थित होते.