लोकप्रतिनिधींच्या पत्रालाही ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ‘नो एन्ट्री’
गडचिरोली, दि. 30, एप्रिल - जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पात लोकप्रतिनिधींचे पत्र घेवून जाणार्या पर्यटकांना प्रवेश नाकारला जात आहे. केवळ वनमंत्र्यांचा अधिकारी असलेल्यांकडून शिफारस मिळालेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या पत्राला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ‘नो एन्ट्री’ असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहेत. त्यातच वाघांची संख्या मोठी असल्याने बाहेरून आलेले व्यक्ती वेळात वेळ काढून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्याची इच्छा व्यक्त क रतात. सध्या ताडोबामध्ये पर्यटनासाठी ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. त्यामुळे वेळेवर येणार्या पर्यटकांना प्रवेशबंदी आहे. हे माहित असल्यामुळे वेळेवर आलेले व्यक्ती व जे व्यस्ततेमुळे ऑनलाईन नोंदणी न करू शकलेले व्यक्ती नजीकच्या लोकप्रतिनिधींचे शिफारस पत्र घेवून जातात. मात्र अशा शिफारस पत्राला आता नाकारल्या जात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयोग राबविले जात आहेत. त्यात शाळकरी मुलांनाही प्रवेश देण्याची शिफारस आहे. असे असतानांही लोकप्रतिनिधींचे पत्र घेवून जाणार्या पर्यटकांना प्रवेश नाकारून प्रकल्पाचे अधिकारी काय साध्य करीत आहेत हे तूर्तास समजू शकले नाही. यामुळे या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.