Breaking News

सोमवारी मौजे बाबुर्डी येथे काळीआई मुक्ती संग्राम व ताबा पडताळणी

खोटे मुखत्यारपत्र व खोट्या खरेदीखताद्वारे लाटलेली जमीन परत मिळविण्यासाठी पिपल्स हेल्पलाईन व ग्रामस्थांच्या पुढाकाराने पारनेर तालुक्यातील मौजे बाबुर्डी येथे दि.30 एप्रिल रोजी बौध्दपौर्णिमेला काळीआई मुक्ती संग्राम व ताबा पडताळणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.


दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पारनेर तालुक्यातील मौजे बाबुर्डी येथे गट नंबर 15, क्षेत्र 3 हे. 6 आर यामध्ये मयत सदाशिव उमाजी वाघमारे व त्यांचा मयत बंधू भाऊ उमाजी वाघमारे यांचा संयुक्त हिस्सा होता. या दोघांच्या मृत्यू पश्‍चात भाऊ वाघमारे यांचा मुलगा प्रेमचंद भाऊ वाघमारे (रा.वरळी मुंबई) याने खोटे शपथपत्र व अर्ज दाखल करुन वरील जमीन भाऊ सदू वाघमारे यांच्या मालकी वहिवाटीची असून त्यांचे वारस म्हणून विकण्याची परवानगी मागितली. भाऊ व सदू हे दोघे सख्खे भाऊ होते. परंतू भावाची जमीन लाटण्यासाठी भाऊ याचे वडिल सदू दाखविण्यात आले. सदरीक खोटी माहिती देवून यासर्व गोष्टी करण्यासाठी शब्बीर सय्यद व पिंपळगाव पिसा येथील जितेंद्र हंसराज पाडळे यांच्या लाभात खोटे मुखत्यारपत्र करुन दि.1 जून 2016 रोजी खोट्या खरेदीखताने सदर जमीन लाटण्यात आली. या दोन्ही व्यक्तींविरुध्द फौजदारी खटला भरण्यासाठी दि.7 ऑगस्ट 2017 रोजी शॅम्युवेल वाघमारे याने अर्ज दिलेला आहे. सुमारे दीड कोटी रुपयाची ही जमीन खोट्या दस्ताच्या आधारे लाटण्यात आल्याने हक्काची जमीन मिळण्यासाठी काळी आई मुक्ती संग्रामाची घोषणा करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या आंदोलनात सरपंचासह गोरक्ष दिवटे, देवराम अरकडे आदिंसह ग्रामस्थ सहभागी होणार असून, या आंदोलनाची नोंद करण्यासाठी महसुल अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनावर शैलेश वाघमारे, प्रशांत वाघमारे, अ‍ॅड.कारभारी गवळी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
जमीनीला चांगले भाव असल्याने फसविण्याचे प्रकार चालू आहे. याकडे महसुल यंत्रणेने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. अशिक्षितपणाने ग्रामीण भागात सावकार अथवा इतर नातेवाईकांकडून फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहे. दुर्बल व वंचितांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी संघटना कार्यरत असून, जमीनीची फसवणुक करणार्‍यांच्या विरोधात काळी आई मुक्ती संग्राम आंदोलन उभे करण्यात आल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी सांगितले आहे.