Breaking News

सद्गुरूंचे कार्य शिष्टाचार म्हणून नव्हे तर श्रद्धापूर्वक करा -भास्करगिरी महाराज

येथील भिस्तबाग परिसरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या किसनगिरीनगर मध्ये नगर भक्त मंडळाच्या वतीने नुकतेच गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून गुरूभक्तीधाम मंदिर बांधण्यात आले या मंदिरातील मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. सद्गुरुंचे कार्य शिष्टाचार म्हणून नव्हे तर श्रध्दापूर्वक करा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.


गुरुभक्तीधाम असे नामकरण झालेल्या या मंदिरामध्ये श्री समर्थ सदगुरु किसनगिरीबाबा, भगवान श्री दत्तात्रय, संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांच्या मुर्त्या आहेत. नुकताच या मंदिराचा कलशारोहन व प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते हजारो भविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की, नगर भक्त मंडळाची सद्गुरू किसनगिरी बाबांबद्दल अपार श्रद्धा आहे, म्हणून जे कार्य करायचे ते श्रद्धापूर्वक केले पाहिजे शिष्टाचार म्हणून नव्हे असा ही संदेश त्यांनी यावेळी बोलतांना दिला. आज तरुण पिढी सुशिक्षित झाली पण संस्कारित झाली नाही मंदिरे ही सांस्कृतिक केंद्रे आहे. मंदिर उभारणी बरोबरच येथे संस्कार मिळतात. उपासना करण्याचे ज्ञान मिळते. मंदिर स्थापनेबरोबर दीन, दुबळे गरीब, गरजू यांच्यासाठी देखील नगरच्या भक्त मंडळाने विधायक कार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
मंदिर उभारणीसाठी योगदान देणार्‍या दानशूर व्यक्तींचा व देणगीदारांचा त्यांनी शब्दसुमनांनी सन्मान केला. यावेळी पिंपराळा, पंढरपूर, औरंगाबाद, टाकळी भान, श्रीरामपूर, गोधेगाव, मुरमे, श्रीरामपूर येथील भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे लाभ उपस्थित भाविकांनी घेतला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने गुरुभक्तीधाम मंदिरावर भव्य विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली