Breaking News

महाराष्ट्र दिनी रंगणार कुस्तीचा आखाडा विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

नगर तालुक्यातील निंबळक येथील ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यात्रोत्सवाचा प्रारंभ सोमवार दि.30 एप्रिल रोजी होणार आहे. तसेच मंगळवार दि.1 मे महाराष्ट्र दिनी कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे. सालाबादप्रमाणे जिल्ह्यातील मल्लांच्या हजेरीत या कुस्ती आखाड्यात पैलवानांची दंगल आकर्षण ठरणार असून, या आखाड्यात मोठ्या संख्येने मल्लांनी सहभागी होण्याचे आवाहन माधवराव लामखडे यांनी केले आहे.


गावातील युवकांचा जथ्था कावडी घेवून प्रवरा संगम येथे गंगाजल आनण्यासाठी निघाला असून, सोमवारी यात्रेच्या दिवशी गंगाजल घेवून ते गावात येणार आहे. मोठ्या उत्साहात कावडीची गावामधून डफ, ढोल, ताशे व लेझीम पथकासह मिरवणुक काढली जाणार आहे. तसेच खंडोबाला या गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा केली जाणार आहे. यात्रे निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री 9 वा. छबीना मिरवणुक काढली जाणार आहे. यानंतर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मराठमोळी ठसकेदार लावणीचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार दि.1 मे रोजी गावातील ग्रीन हिल स्टेडियम येथे कै.संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ माधवराव लामखडे मित्र मंडळाच्या वतीने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी निंबळक यात्रा कमिटी व ग्रामस्थ परिश्रम घेत असल्याची माहिती माजी सरपंच विलास लामखडे यांनी दिली. यात्रे निमित्त गावातील खंडोबा मंदिराला रंगरंगोटी करुन, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.