Breaking News

महापालिका कर्मचार्‍यांची थकित पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा

दोन महिन्यांची थकित पेन्शन मिळण्यासाठी नगर पालिका व महानगरपालिका पेन्शनर्स असो. च्या वतीने उपायुक्त दिगंबर कोंडा यांना घेराव घालून, त्यांना धारेवर धरण्यात आले. सदर प्रश्‍न आयुक्त घनश्याम मंगळे यांच्यापुढे मांडला असता त्यांनी थकित पेन्शन अदा करण्याचे तातडीने आदेश काढले.


महापालिकेने दि.28 एप्रिल पर्यंन्त सर्व थकित पेन्शनर्सची देणे देण्याचे मंजुर केले असताना यावर कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसल्याने, संघटनेने आक्रमक पवित्रा घेत उपायुक्त दिगंबर कोंडा यांना घेराव घालून तातडीने थकित पेन्शन मिळण्याची मागणी केली. चर्चेने हा प्रश्‍न सुटत नसल्याने पेन्शनर्सनी हा प्रश्‍न आयुक्त मंगळे यांच्यापुढे मांडला. त्यांनी तातडीने धनादेश काढून पेन्शनर्सचे थकित देणे देण्याचे आदेश काढल्याने कर्मचार्‍यांना थकित पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी असो. चे अध्यक्ष एन.एम. पवळे, डी.यू. देशमुख, रंगनाथ गावडे, दिलीप पाठक, कांतीलाल वर्मा आदिंसह पेन्शनर्स उपस्थित होते.