Breaking News

पढेगाव-दहेगाव रस्त्यावर खडीचे ढिगारे खडीमुळे ४ दिवसांत ३ अपघात


कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्यातील पढेगाव दहेगाव रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला असल्याची पूर्वसूचना या रस्त्यावरील खडीच्या ढिगाऱ्यांमुळे मिळत आहे. मात्र असे असले तरी सध्या ठेकेदाराने या रस्त्यावरच खडीचे ढिगारे टाकले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांसह प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. ठेकेदाराच्या चुकीमुळे या भागांत दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या खडीमुळे चार दिवसांच्या कालावधीत चक्क तीन अपघात झाले आहेत.

अनेक वर्षांपासून या खड्ड्यांचा सामना करत कुठेतरी आता चांगल्या रस्त्याची चाहूल या मार्गावरुन नित्याने प्रवास करणाऱ्यांना लागली. मात्र अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे खडीचे ढिगारे रस्त्यावरच दुतर्फा टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन दुचाकी चालविणेही मोठे कसरतीचे झाले आहे. येथील प्रशांत आगवण, शंकर आगवण, किरण लंके आदींचा या रस्त्यावरील खडीच्या ढिगाऱ्यामुळे अपघात होऊन त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर स्थानिकांनी खडी वाहतुकीच्या वाहनांना खडी टाकण्यास मज्जाव केला. मात्र ठेकेदाराने ढिग बाजूला करण्याचे आश्वासन दिले. तरीही अद्याप ढिगारे रस्त्यावरच पडलेले आहेत. याबाबत बांधकाम विभागाने अद्यापतरी पाहणी केल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे काम सुरु होण्यापुर्वीच हे ढिगारे एखाद्याचा बळी घेणार की काय, अशी भिती व्यक्त होत आहे.