Breaking News

नेवासा येथे जी एस टी कार्यशाळा


नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - जीएसटी मध्ये कंपोजिशन ही सर्वात सोपी कर प्रणाली आहे व छोट्या व्यापार्‍यांसाठी सुलभ सुटसुटीत असल्याने महाराष्ट्र सर्वात जास्त टॅक्स भरणारे राज्य झाले आहे. या स्कीमचा तालुका पातळीवरील व्यावसायिकांनी कोणताही किंतु न बाळगता लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त रविंद्र पाटील यांनी केले आहे. नेवासा येथे आशिष फिरोदिया यांनी आयोजित केलेल्या शहर व परिसरातील व्यापार्‍यांसाठी आयोजित केलेल्या जीएसटी या कर प्रणालीच्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी असिस्टंट कमिशनर सुनील दानी व संजय म्हस्के हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला परिसरातील सर्व स्तरातील व्यापारी मोठ्या संख्येने हजर होते. सदरच्या व्यापार्‍यांनी विचारलेल्या अडीअडचणी व प्रश्‍नांना रविंद्र पाटील यांनी उत्तर दिले. आशिष फिरोदिया यांनी स्वागत केले. विभागीय आयुक्त सुनील दानी व संजय म्हस्के यांनी ई वे बिल वर डेमो दाखवून व्याख्यान दिले. पेपरलेस अकौटिंगसाठी ई वे बिल हा सोपा मार्ग झाला आहे. मालाची ने आण करतांना सोयी सुविधांसाठी विक्रेते ट्रान्सपोर्ट करणारे अथवा खरीदार कोणीही ई वे बिल रेजीस्टर करू शकतात. 50 हजार पेक्षा जास्त व 50 किमी पेक्षा जास्त अंतरावर खरेदी विक्री केलेल्या मालाची वाहतूक करायची असेल तर ई वे बिलाची अत्यंत गरज आहे. स्वतःचे वाहन असले तरीसुद्धा सदरचे बिल जवळ ठेवणे गरजेचे आहे व ट्रान्सपोर्ट चालकाने छोट्या छोट्या किमतीचा माल असेल तर या मालाची लिस्ट तयार करून स्वतःजवळ बाळगणे गरजेचे आहे. ई वे बिल नसल्यास अधिकार्‍याला सदरचा माल जप्त करण्याचा व दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी व्यापार्‍यांनी खरेदी विक्री करतांना काटेकोरपणा पाळावा असे आवाहन त्यांनी केले. या व्याख्यानानंतर ज्येष्ठ व्यापारी अशोक गुगळे, अनिल फिरोदिया,अमृत फिरोदिया यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.