दीड वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
बुलडाणा, दि. 22 - मागील दीड वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. ही कारवाई 18 जून रोजी मध्यरात्रीचे सुमारास नागपूर जिल्ह्यातील वडगाव बक्शी येथे करण्यात आली. मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रूक येथील रहिवासी अतुल बाळकृष्ण पाटील यांनी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, ते त्यांचा भाऊ हे शेतात सकाळी दूध काढण्यासाठी गेले असता त्यांचे वडील बाळकृष्ण नवृत्ती पाटील हे बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले दिसून आले. या तक्रारीवरून पोलिसांनी 25 एप्रिल 2016 रोजी गुन्हा दाखल केला होता. खुनाच्या घटनेपासून सदर आरोपी हा फरार होता. दरम्यान तो त्याची पत्नी ओळख लपवून चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, बालाघाट नागपूर येथे जागा बदलून राहात होता. आरोपीच्या शोधार्थ वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. आरोपी हा नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सिमेवरील वडगाव बक्शी येथे राहात असल्याची माहिती पथकाला मिळाली. यावरून पथकाने 18 जून रोजी मध्यरात्री वडगाव बक्शी गाठून आरोपी संदीप दत्तात्रय पाटील वय 34 यास अटक केली. यासाठी बुटीबोरी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ जयसिंगपुरे यांची मोलाची मदत झाली. ही कारवाई एलसिबिचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनायक कोरगावकर, नापोका नंदकिशोर धांडे, गजानन अहेर, दिपक पवार, अमोल अंभोरे, अमोल तरमळे, विवेक तायडे यांनी केली आहे. कारवाईसाठी आरोपीस मलकापूर ग्रामीण पोलिसाच्या हवाली केले.