वीज पडून दोघे जखमी
भंडारदरा परिसरात मंगळवारी (१७ एप्रिल) दुपारी ४ च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या कडकडासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यात पांजरे येथे वीज पडून शेतात काम करणारे दोन जण गंभीर जखमी झाले. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसामुळे गहू व पेंढा यांचे मोठे नुकसान झाले.भंडारदरा पाणलोट क्षेत्र तसेच बारी, वासळी, वारूंघुशी, पेंडशेत, चिंचोडी, शेडी या ठिकाणी मंगळवारी दुपारी ४ ते ५ या वेळेत जोरदार पाऊस झाल्याने या भागातील जनजीवन विस्कळित झाले. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. पांजरे येथे शांताबाई भोरू उघडे (वय ४०) आणि तुकाराम उघडे (वय ४५) हे एकच कुटुंबातील आदिवासी शेतकरी आपल्या घराजवळ काम करीत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास वीज पडून गंभीर जखमी झाले.