Breaking News

पुस्तकी ज्ञानापेक्षा समाजातील विविधता कळावी : शिंदे


सात्रळ / प्रतिनिधी - रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करण्याचे काम केले जाते याच बरोबर देशाची भावी पिढी घडविण्याचे उत्तम कार्य रयत शिक्षण संस्थेने प्रामाणिक पणे पार पाडले आहे. कर्मवीराच्या कार्याचा खरा वारसा चालविण्याचे काम या संस्थेने प्रभावीपणे केलेले आहे. आज विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा समाजातील विविधता मुलांना कळल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. शशिकांत शिंदे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब कडू विद्यालयात गुरुकुल प्रकल्पांतर्गत विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, रयतचा माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. छोट्या छोट्या स्पर्धातील यश हे विद्यार्थ्यांना पुढे मार्गदर्शक ठरते. यावेळी त्यांनी पाठ्यपुस्तकातील त्यांच्या ‘माणूसपण गारठ्लय’ या व इतर कवितांचे वाचन करत सामाजिक भावार्थ समजावून दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी रयत चे माजी विभागीय अधिकारी बी. वाय. शिरसाठ म्हणाले, की ‘रयत’मध्ये गुणवंत विद्यार्थांच्या विकासाबरोबरच सर्वच विद्यार्थांना सामावून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत नानासाहेब कडू विद्यालय सात्रळ येथे उत्तम असे कार्य चालू आहे. रयतने नेहमीच तळागाळातील सर्वसामान्याचा विचार करून वाटचाल केलेली आहे. कारण या संस्थेला कर्मवीरांच्या बरोबर कॉ पी. बी कडू पाटील यांचा थोर वारसा लाभलेला आहे.

यावेळी प्रगती पतसंस्थेचे चेअरमन अॅड. विजय कडू, प्राचार्य एल. बी. आसावा, रयत सेवक संघाचे सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर, पर्यवेक्षक बी. बी. गोसावी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. के. के. बोरा होते. प्रारंभी रयत गुरुकुल विभाग प्रमुख सच्चिदानंद झावरे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे नियोजन गुरुकुल प्रमुख झावरे एस. एस, गुरुकुल विभाग उपप्रमुख गभाले व्ही. बी. आदींनी केले. सूत्रसंचालन अशोक गोसावी यांनी केले. पोपट पवार यांनी आभार मानले.