Breaking News

मुलींना आरोग्य, कायदा व व्यावसायिक मार्गदर्शन आवश्यक : काळे

कोपरगाव ता. प्रतिनिधी - समाजात महिलांना सर्वात जास्त समस्यांना सामोरे जावे लागते. आजच्या मुली या उद्याचा समाज घडविणार आहेत. त्यासाठी मुलींना आरोग्य, कायदा व व्यावसायिक मार्गदर्शन मिळणे, ही काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले. 


तालुक्यातील चांदेकसारे येथे पंचायत समितीच्यावतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सभापती अनुसया होन होत्या. काळे म्हणाल्या, मुलींनी आपले आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी चांगला आहार घेतला पाहिजे. मुलींच्या प्रत्येक पालकांना आपली मुलगी शिकून मोठी व्हावी, असे स्वप्न उराशी बाळगलेले असते. त्यासाठी त्यांना अपार कष्ट सोसावे लागतात. याची जाणीव मनात ठेवून प्रत्येक मुलीने जिद्दीने शिकले पाहिजे. शिक्षण घेत असतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या फायद्यासाठी करावा.

यावेळी अॅड. धोर्डे, सोनवणे, डॉ. विधाते आदींनी कायदा, व्यवसाय व आरोग्य याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुधाकर दंडवते, पं. स. सदस्य मधुकर टेके, माजी व्हाईस चेअरमन आनंदराव चव्हाण, दगु होन, रोहिदास होन, अॅड. राहुल रोहमारे, डॉ. खोत, संजय होन, श्रीमती आढाव, वराडे, रणशूर, कानडे, ढेपले आदींसह विद्यार्थिनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.