Breaking News

महिलांचे स्वातंत्र धोक्यात ; कठोर कायदे करा : तांबे संगमनेरात निघाला विराट ‘कँडल मार्च’


संगमनेर प्रतिनिधी - जम्मू काश्मिरमधील असिफा तसेच सुरतमधील उन्नाव येथील निर्भयावरील अत्याचार हे प्रकार अतिशय निंदनीय आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. अशा घटनांमुळे महिलांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आह. त्यामुळे यापुढे कठोर कायदे करा, अशी मागणी महिला नेत्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केली. देशभरात संताप पसरविणाऱ्या निर्भया अत्याचारविरोधाचा येथील महिलांनी विराट ‘कँडल मार्च’ने निषेध नोंदविला.

शहरातील स्वातंत्र्यचौक, मेनरोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दरम्यान तांबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला व नागरिकांनी या ‘कँडल मार्च’मध्ये सहभाग घेतला. यावेळी विश्‍वास मुर्तंडक, बाबा ओहळ, सभापती निशा कोकणे, प्रा. बाबा खरात, प्रकाश कलंत्री, शैलेश कलंत्री, खेमचंद निहलानी, बाळासाहेब पवार, सुहासनी गुंजाळ, अर्चना बालोडे, सुनिता कोडे, अ‍ॅड. ज्योती मालपाणी, अ‍ॅड. निशा शिवरकर, सुनंदा दिघे, दिलीप पुंड, शिवाजीराव थोरात आदींसह विविध पदाधिकारी आदींनी काळ्या फिती लावून या मोर्चात सहभाग नोंदविला.

तांबे म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीला मोठी समृध्द परंपरा आहे. मात्र काही विकृत शक्तींना सध्याचे सरकार पाठीशी घालत आहे. देशात सध्या स्त्रियांचे स्वातंत्र धोक्यात आले आहे. लहान मुलींचे बालपन हरवण्याची भिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगतांना अशा घडणार्‍या घटना या सर्व भारतीयांसाठी निंदणीय आहेत. हे गुन्हेगार व त्यांना समर्थन देणारे यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या खटल्यांसाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ सुरु करावे.