मध्यमेश्वर मंदिर विकास कामासाठी निधी मंजूर
नेवासा ,प्रभू श्रीरामचंद्राच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या नेवासा येथील श्री. मध्यमेश्वर मंदिरासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून सुशोभीकरण व परिसर विकासासाठी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नाने सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता बर्डे यांनी दिली. संत ज्ञानेश्वर व मोहिनिराजांचे नेवासा आता म्हाळसेचे नेवासा देखील आहे. तसेच पुराण प्रसिद्ध मध्यमेश्वर मंदिरही आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नाने प्रकाशझोतात येत आहे.
नेवाशाची जीवनदायिनी असलेल्या प्रवरा नदीवरील मध्यमेश्वर बंधारा आणि आजूबाजूचा झाडीचा परिसर यामुळे मध्यमेश्वर मंदिर हे एक नैसर्गिक सुंदर ठिकाण आहे. नदीकिनार्यावर घाट सुशोभित करणे गरजेचे होते. तसेच मंदिराच्या भव्य परिसरामध्ये सुशोभित करतांना नदीकिनारी घाटासह पेव्हिंग ब्लॉक व सुलभ शौचालयाचाही प्रस्ताव नगर पंचायतीतर्फे देण्यात आला होता.महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाला सदरच्या मंदिर विकासाचा प्रस्ताव नगराध्यक्ष झाल्यानंतर दुसर्याच महिन्यात तयार करून पाठविला होता. सुंदरसा नदी किनारा व मध्यमेश्वर बंधार्यामुळे सदरचे गावाबाहेर असलेले मंदिर पर्यटनाचे ठिकाण म्हणून विकसित होईल. तसेच याठिकाणी परिसरातील दशक्रिया विधी नेहमी होत असतात. त्यामुळे देखील याठिकाणी होत असलेल्या वर्दळीमुळे याठिकाणी सोयीसुविधांची गरज होती. त्यामुळे या प्रस्तावास मान्यता मिळाली.