कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत प्रशासकीय स्तरावरील निर्णयासाठी पाठपुरावा करु - ना विखे पाटील
शिर्डी संस्थानमधील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी शिर्डी येथील स्वामी रिसोर्ट येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कंत्राटी कामगारांसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,विलास कोते,नितीन कोते,सुजीत गोंदकर,जगन्नाथ गोंदकर, पोपट शिंदे,अनिल कोते आदी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात ना.विखे पाटील म्हणाले की, संस्थानमधील कामगारांच्या प्रश्नासाठी माझी नेहमीच सहानुभूती राहीली आहे. मागील वेळेस निर्णय घेतला त्यावेळी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे मोठे सहकार्य मिळाले याचा आवर्जून उल्लेख करीत विखे पाटील म्हणाले की, आता उर्वरित कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत निर्णय झाला. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी या प्रश्नावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असल्याने या प्रश्नात कोणतीही अडचण राहीली नसल्याचे त्यांनी कामगारांना सांगतानाच अस्थायी पदांचे रूपांतर स्थायी पदामध्ये करून शासन स्तरावर प्रशासकीय आदेश काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वासित केले. माझ्याकडे असलेले विरोधी पक्षनेते पद हे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठीच आहे. येथे श्रेयाचा प्रश्न नाही. कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून मी सदैव तुमच्या बरोबर आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
कामगारांनी आफवावर विश्वास न ठेवता प्रशासकीय निर्णय कसा होईल असाच प्रयत्न करा असे आवाहन करून विरोधी पक्षनेते म्हणाले की, तुमची एवढ्या वर्षे झालेली सेवा महत्त्वपूर्ण असून जीवनात स्थैर्य यावे ही अपेक्षा साईबाबांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल. आता फक्त जय साईनाथ म्हणा साईराम म्हणून शिर्डीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
तळेगाव मध्ये आंदोलन करुन काय साध्य केले!
शिर्डीच्या विकासाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे. विकासाचा निधी उपलब्ध होत आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी सरकार निधी देणार आहे. पण काहीना हे सहन होत नाही. म्हणून आता माझ्याविरुद्ध भाषण सुरू झाली आहेत.वास्तविक कालव्यांसाठी अकोल्यात आंदोलन करायला पाहिजे होते.तळेगावला आंदोलन करून काय साध्य केले? माझ्या विरोधात बोलून कालव्यांच्या प्रश्न मार्गी लागणार असेल तर खुशाल बोलत राहा असा टोला विखे पाटील यांनी माजी मंत्री थोरात यांना लगावला.