Breaking News

श्रमदानासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे राक्षसवाडीत

कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक हे गाव पानी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. गाव परिसरात चर खोदून जलसंधारणाची कामे वेगाने सुरु आहेत. या कामात अधिकारी, पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. ग्रामीण जनतेशी नाळ जोडलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे हेही आता या कामात सक्रिय होत आहेत. गुरुवारी (दि.19) सकाळी सात वाजता पालकमंत्री पुण्याहुन राक्षसवाडी बुद्रुक येथे येवून येथील कामाची पाहणी करुन श्रमदान करणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य शांतिलाल कोपनर यांनी दिली.

राक्षसवाडी येथे गेल्या आठवड्यापासून ही कामे सुरु आहेत. गावाच्या परिसरातील माळरानावर चर खोदून पावसाचे पाणी जिरविण्यासाठी ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच तहसीलदार किरण सावंत, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर तसेच भारतीय जैन संघटना यांचे याकामी विशेष योगदान आहे. तालुक्यातील महिला संघटनाही या मोहिमेत सक्रिय झाल्या आहेत. ग्रामविकासासाठी संजीवनी ठरणार असलेल्या या कामात पालकमंत्री प्रा. राम शिंदे स्वतः सहभागी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये वेगळीच चेतना निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या कामांची पाहणी होणार असुन पालकमंत्री यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुदर्शन कोपनर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.