Breaking News

शेतक-यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करावा : आ. कोल्हे

कोपरगांव: प्रतिनिधी - लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या गरजा आणि त्यातून निर्माण होणा-या अडी-अडचणींची सोडवणूक करण्यासाठी कृषी अधिका-यांनी सतर्क असले पाहिजे. कांदा उत्पादन मोठया प्रमाणात झाले आहे. मात्र त्याच्या साठवणुकीसाठी शेतक-यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब केला पाहिजे, असे मत आ. स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले. 

मतदारसंघातील आगामी खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक नुकतीच कृषी कार्यालयात आ. कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. शासनाच्या नाविन्यपूर्ण शेती कृषी औजारे योजनेअंतर्गत मतदार संघातील १० लाभार्थी शेतक-यांना ट्रॅक्टर व कृषीविषयक औजारे आदींचे यावेळी वाटप करण्यात आले. संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी बी. एन. मुसमाडे यांनी मतदारसंघातील खरीप पीक नियोजनाचा आराखडा या बैठकीत सादर केला. तालुका कृषी अधिका-यामार्फत केलेल्या उपाय योजनांची यावेळी माहिती देण्यात आली. आ. कोल्हे म्हणाल्या, आज समाजमाध्यमी वेगाने बदलत आहेत. सोशलमिडियाचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी एकमेकांनी आपल्या शेती प्रगती आणि पीक उत्पादनवाढीबाबतच्या संदेशाचे आदान-प्रदान करून सेंद्रीय शेती करण्यावर भर द्यावा.

या खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीस सुनिल देवकर, ‘आत्मा’चे राजेंद्र खिलारी, महाराष्ट्र राज्य पेस्टीसाईड सीडस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कवडे, माजी गटनेते केशव भवर, पंचायत समिती सदस्या सुनिता संवत्सरकर, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे आदींसह विविध गांवचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. माजी सभापती मच्छिंद्र केकाण यांनी आभार मानले.