Breaking News

दिवसाढवळ्या १३ लाखांचा ऐवज लुटला

कोल्हार : येथील बाजारपेठेत असलेल्या सराफाच्या दुकानातून तीन चोरटयांनी सोने, चांदी व रोख रक्कम असा १३ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. चोरीची घटना नजिकच्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाली आहे. सकाळी ९ च्या सुमारास कोल्हारच्या स्व. माधवराव खर्डे पाटील चौकात आठवडेबाजाराच्या दिवशी ही घटना घडली. राहाता तालुक्यातील कोल्हार येथे सुभाष चांगदेव सुपेकर यांचे सुपेकर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान आहे. दुकानाचे दुस-या बाजूचे शटर उघडल्यानंतर दुसऱ्या शटरचे कुलूप उघडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्या कुलुपामध्ये फेवीकॉल सारखा द्रव्य पदार्थ व लाकडाच्या काड्या टाकलेल्या होत्या. दरम्यान, ते दुकान उघडण्यात व्यस्त असल्याचे पाहून समोर दबा धरून बसलेल्या चोरट्याने दुकानात प्रवेश करत काउंटर आत असलेली सोने, चांदी व रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन बाहेर दुचाकी घेऊन उभ्या असणा-या साथीदारांसोबत धूम ठोकली. या पिशवीमध्ये १० लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोने, १ लाख ६० हजार रुपयांची साडे चार किलो चांदी व रोख ४२ हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे १३ लाख लाखांचा ऐवज होता.