Breaking News

जामखेडमध्ये गोळ्या घालून दोघांची हत्या आज जामखेड बंदची हाक

शहरातील बीड रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरातील एका हॉटेल समोर काही अज्ञात हल्लेखोरांनी मोटारसायकलवरून येऊन अचानक अंदाधुंद केलेल्या गोळीबारात योगेश अंबादास राळेभात (वय 32) तसेच राकेश अर्जुन राळेभात (वय 23) या राष्ट्रवादी काँगे्रसच्या दोघांची हत्या करण्यात आली. शनिवारी जामखेडचा आठवडे बाजार असल्याने शहरात गर्दी होती. बीड रोड मार्केट यार्ड परिसरात बाजारकरूंसह नागरिकांची नेहमी मोठी वर्दळ असते. योगेश आंबादास राळेभात व राकेश अर्जुन राळेभात हे सायंकाळी 6 वा मित्रांसह बीड रोडवरील मार्केट यार्ड परिसरातील एका हॉटेलवर थांबले होते. यावेळी तोंडाला काळा रूमाल बांधून एका मोटारसायकलवरून तीन अज्ञात हल्लेखोर आले, त्यापैकी एकाने खाली उतरून गोळीबार केला. तोपर्यंत दोघे चालू मोटारसायकलवर बसून राहिले. त्याच वेळी तेथे एका लग्नाच्या वरातीचा डीजे वाजत असल्याने गोळीबाराच्या आवाजाचा अंदाज आला नाही. योगेश राळेभात यांना दोन तर राकेश राळेभात यांना एक गोळी लागली आहे. डॉक्टरांना अनेक फोन केले, परंतु डॉ. न आल्याने दोन्ही जखमींना तातडीने रूग्णवाहिकेतून अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती समजताच पो. काँ. विजय कोळी, पो. काँ. राहूल हिंगसे घटनास्थळी पोहोचले. सदर घटना शहरात वार्‍यासारखी पसरली. नागरिक ग्रामीण रुग्णालयाकडे धावत होते. तीन महिण्यात जामखेडमध्ये गोळीबाराची ही दूसरी घटना आहे.

तिन महिन्यांच्या आतच शहरात दुसरी घटना यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेतले जाणार नाहीत असा पवित्रा नातलगांनी घेतला आहे. आज रविवारी जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयात डॉ हजर नव्हते. कामावर असणार्‍या परिचारीकेने तात्पुरते उपचार केले व जखमींना नगर येथे उपचारासाठी पाठवले. ग्रामीण रुग्णालयाबाबत वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. व डॉ लामतुरे यांना चांगलेच धारेवर धरले. कामात हलगर्जीपणा करणार्या डॉक्टर वर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
तीन महिन्यात दुसर्‍यांदा गोळीबार
एक फेब्रुवारी रोजी जामखेड शहरामध्ये गोळीबार होऊन दोन जखमी झाले होते. या घटनेला तीन महिने पूर्ण झाले नाहीत तरच ही दुसरी घटना घडली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांचा मतदारसंघ हा बिहार झाला आहे काय अशी चर्चा परिसरात आहे.


हत्याकांडाचे नेमके कारण अस्पष्ट
नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत काहीही समजू शकले नाही. शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. लोकांनी आपापली दुकाने बंद केली. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली जामखेड मध्ये तीन महिन्यांच्या आतच भरदिवसा ही दुसरी घटना घडली आहे.