Breaking News

नाणार परिसरात मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचे फलक


रत्नागिरी, नाणार रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरीसाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नसल्याचा खुलासा केला. याच मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली असून मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेने निषेध नोंदविला आहे. त्याबाबतचे फलक नाणार परिसरामध्ये ठिकठिकाणी झळकले आहेत. 

नाणार परिसरात शिवसेनेचे वर्चस्व असताना रिफायनरीच्या भूसंपादनाची अधिसूचना सेनेचे उद्योगमंत्री देसाई यांच्या स्वाक्षरीने जारी झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये शिवसेनेबाबत तीव्र नाराजी आहे. त्यातूनच प्रकल्पग्रस्तांसह विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. रिफायनरीवरून होत असलेली ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नुकत्याच झालेल्या प्रकल्पविरोधी सभेमध्ये उद्योगमंत्री देसाई यांनी भूसंपादनचा अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने प्रकल्पग्रस्तांची मने जिंकण्यामध्ये काहीअंशी सेनेला यश आले असले तरी त्यांच्या घोषणेनंतर थोड्याच वेळेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी असा अध्यादेश रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नसल्याचा खुलासा केला. त्यातून शिवसेनेची पुन्हा एकदा कोंडी झाली. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेना कंबर कसत असताना भाजप मात्र प्रकल्प होण्यासाठी कमालीचा आग्रही आहे. त्यातून शिवसेनेचा संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद नाणार परिसरात उमटत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध केला जात असून त्या आशयाचे फलक प्रकल्प परिसरातील गावांमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.