Breaking News

… आणि ‘त्या’ कुटुंबाला मिळाले संसारोपयोगी साहित्य!


राहुरी प्रतिनिधी - तालुक्यातील कनगर (वडाचे लवण ) येथील संजय बर्डे यांच्या घराला चार दिवसांपूर्वी आग लागली. यात त्यांचे संसारोपयोगी साहित्य जळून गेले होते. संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. मात्र समाजत अद्याप माणुसकी आहे, हे या कुटुंबाच्या निदर्शनात आले. येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या कुटुंबाला मोठा आधार दिला. 
घरात लावलेल्या दिव्याला मध्यरात्री मांजराचा धक्का दिल्याने बर्डे यांच्या घराला आग लागली होती. घर झोपडीवजा असल्यामुळे आगीन रौद्ररूप धारण केले होते. परंतु सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. क्षणार्धात संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. सदर कुटुंब मोलमजुरी करून आपल्या पाच सदस्यांचा उदरनिर्वाह करत होते. पै पै करून १० हजार रुपये गाय घेण्यासाठी साठवले तेही आगीत भस्मसात झाले. 

भांडी धान्य, कपडे, किराणा आगीत भस्मसात झाल्यामुळे या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली. सरकारी यंत्रणा पंचनामा करून गेली. पण पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा राहिला. या कुटुंबातील दोन मुले अजय बर्डे व विशाल बर्डे हे जि. प. शाळा गाढेवस्ती {कणगर} या शाळेत शिकत आहेत. सदर घटनेमुळे या मुलांना ना कपडे उरले, ना शाळेत येण्यासाठी दप्तर. दुसऱ्या दिवशी शिक्षकांना या घटनेची माहिती समजताच त्वरित बर्डे यांचा संसार पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करण्याचे ठरले. 

या शाळेतील शिक्षक काकडे यांनी ड्रेस मिळविण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष व सागर ड्रेसेसचे मालक तौसिफ सय्यद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लागलीच होकार दर्शविला आणि या मुलांना शाळेच्या कपड्यांसह दररोजच्या वापरासाठी रंगीत कपडेही मिळाले. अन्य शिक्षकांनी तोसिफ यांच्यापासून प्रेरणा घेऊन बर्डे कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला. बाळासाहेब आरंगळे यांनी पाच पायली ज्वारी, वापरत्या साड्या व मुलांसाठी कपडे दिले. विठ्ठल काकडे यांनी मुलांसाठी वापरते कपडे व साड्या दिल्या. मुख्याध्यापक शिंदे यांनी आगामी शैक्षणिक वर्षाचे लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य सदर कुटुंबातील मुलांना देण्याचे जाहिर केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब कवाणे यांनीही एक पोते धान्य देण्याचे जाहिर केले. 

दरम्यान, जमा झालेले हे सर्व संसारोपयोगी साहित्य तौसिफ सय्यद, ग्रामपंयात सदस्य बाबासाहेब गाढे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब कवाणे, वडनेरचे मुख्याध्यापक शिंदे, किरण रोकडे, बाळासाहेब आरंगळे, बापूसाहेब गाढे, बापूसाहेब मुसमाडे, संदीप गाढे, संजय जाधव, अजय जाधव, पवण गाढे, पप्पू जाधव, अण्णासाहेब गाढे, दादा गाढे आदींच्या उपस्थितीत या कुटुंबास सुपूर्द करण्यात आले.