बबन’च्या टीमची गोरोबा टाॅकिजला भेट प्रेक्षकांशी साधला संवाद
गोरोबा टाॅकीजच्या माध्यमांतून जामखेड शहरातील सिनेरसिकांसाठी आधुनिक सिनेमागृहाची भेट देणार्या विठ्ठल आण्णा राऊत व विनायक राऊत यांनी ‘बबन’ चित्रपटातील प्रमुख अभिनेता भाऊसाहेब शिंदे व अभिनेत्री गायत्री जाधव यांचे स्वागत केले. यावेळी चित्रपटाचे गीतकार सुहास मुंडे, संगीतकार ओंकार स्वरूप, इंद्रभान करे आदी उपस्थित होते.
यावेळी ‘बबन’ चित्रपटातील प्रमुख अभिनेता भाऊसाहेब शिंदे म्हणाला की, ‘ख्वाडा’ या चित्रपटाने उभे राहायला तर बबनने चालायला शिकवलं. मराठी चित्रपटाच्या परिभाषेत ग्रामीण बाज आणण्याबरोबरच ग्रामीण प्रश्नांची प्रभावी मांडणी करण्यासाठी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. अलीकडच्या काळातील गावगाडयाचं वास्तव चित्रण ‘बबन’मधून होतंय. खेड्यातील कोणत्याही माणसाने हा चित्रपट पाहिला तर त्याच्यासमोर गावातील पात्र उभे राहतात. ती आपली वाटतात. बबनचं गाव हे त्याला आपलं गाव वाटू लागतं आणि त्याच्या गावातील बबन कोण, हे सुद्धा त्याला कळतं. म्हणून सर्वांनी ‘बबन’ला साथ द्यावी.