Breaking News

छिंदमविरोधात आज नगरात मोर्चा

राहुरी प्रतिनिधी - हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावे, या मागणीसाठी उद्या {दि. ३ } रोजी सकाळी दहा वाजता अहमदनगर शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती देवेंद्र लांबे यांनी दिली. 

ते म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या उपमहापौरपदी कार्यरत असलेल्या छिंदमने छत्रपती शिवयांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे सामजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. छिंदमचा संपूर्ण इतिहास पाहता तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व दहशत करणारा असल्याचे स्पष्ट दिसते. त्याने केलेल्या या दुष्कृत्यामुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्र आहेत. यामुळे कुठला अनुचित प्रकार होऊ शकतो. त्यामुळे छिंदमला राज्यातून तात्काळ तडीपार करण्यात यावे, या मागणीसाठी आणि छत्रपती शिवरायांच्या कार्याला वंदन करण्याच्या हेतूने नगर शहरात शिवसन्मान मोर्चा काढण्यात येणार आहे. इंपिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा माळीवाडा वेस, पंचपीरचावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे चौपाटी कारंजा येथे आल्यानंतर या मोर्चाचा समारोप होणार आहे. सर्व शिवप्रेमींनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी केले आहे.