Breaking News

बाबा आदमच्या जमान्यापासून होतात बलात्कार कोरिओग्राफर सरोज खान यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : ‘हे तर बाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहे. प्रत्येक मुलीवर कोणी ना कोणी हात साफ करण्याचा प्रयत्न करत असतात’ असे वादग्रस्त वक्तव्य बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी केले आहे. कास्टिंग काऊचवर सगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना सरोज खान यांनीही आपलं मत मांडलं आहे.
’कास्टिंग काऊचसारखे प्रकार सरकारी लोकही करतात’ असंही त्या म्हणाल्या. पण दरम्यान यावर वादग्रस्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

कास्टिंग काऊचवर बोलताना सरोज खान म्हणाल्या की, ’जर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही चुकीचं झालं तरच सगळ्यांना रोटी मिळते. पण लोकांनी सिनेसृष्टीच्या मागे लागू नये.’ असंही त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, ’सिनेसृष्टीत मुलींसोबत काही चुकीचं झालं तर त्यांना नोकरी मिळते, बलात्कार करून त्यांना सोडून दिलं जात नाही. हो, आता यावर काय करायचं हे सर्वस्वी त्या मुलीवर आहे. तुम्हाला या गोष्टी मान्य नसतील तर तुम्ही या क्षेत्रात येऊ नका. जर तुमच्याकडे कला आहे तर त्यासाठी स्वत:ला विकण्याची काहीच गरज नाही.’ खरं तर सरोज खान यांनी त्यांच्या नृत्याने बॉलिवूडवर राज्य केलं. पण त्याआधी एक स्त्री म्हणून अशा संवेदनशील विषयावर असं वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण क्षेत्रातून त्यांच्यावर टीका होत आहे.