Breaking News

36 तासात 37 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : समाज, देश आणि व्यवस्थेला घातक असलेल्या नक्षलवाद्यांच्या विरोधात गडचिरोली पोलिसांनी ऐतिहासीक कामगिरी बजावत अवघ्या 36 तासात 37 नक्षल्यांचा खात्मा केला आहे. माओवाद्यांच्या विरोधातील गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल पोलिसांचे देशभर कौतुक होते आहे. 
गडचिरोली जिल्ह्यातील बोरिया जंगलात 22 एप्रिलच्या सकाळी पोलिसांचे सी-60 पथक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाची बटालियन -9 यांच्या संयुक्त कारवाईत 16 नक्षली ठार झाले होते. तर मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झालेल्या नक्षलवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला होता. त्यापैकी 15 नक्षलवाद्यांचे मृतदेह आज, मंगळवारी सकाळी आढळून आलेत. त्यामुळे रविवारी झालेल्या चकमकीतील मृतांचा आकडा 31 झाला आहे. तर अहेरी येथील राजाराम खांदला येथे सोमवारी 23 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. त्यामुळे अवघ्या 36 तासात एकूण 37 नक्षवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार 21एप्रिलच्या रात्री सी-60 पथक व सीआरपीएफच्या क्रमांक-9 बटालियनच्या जवानांनी ताडगावनजीकच्याबोरिया जंगलात नक्षल्यांना घेरले होते. रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत 16 ठार झाले.त्यात डीव्हीसी सिनू, त्याची पत्नी कमांडरशांता व पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी साईनाथ यांचा समावेश होता. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली असता इंद्रावती नदीच्या पात्रात आणखी 15 नक्षल्यांचे मृतदेह आढळून आलेत. त्यामुळे रविवारच्या चकमकीतील मृतांचा आकडा 31 झाला आहे. तर दुसरीकडे अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला परिसरात 23 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत 6 नक्षली ठार झाले. कमांडर नंदू यात ठार झाल्याचे समजते. ही कारवाई अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक ए.राजा व डॉ.हरी बालाजी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या 6 नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले असून, इंद्रावती नदीच्या पात्रात आढळलेल्या नक्षल्यांचे मृतदेह आणण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल उंचावले असून, आजपर्यंतच्या इतिहासात नक्षल्यांना सर्वांत मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी गडचिरोलीला पोहचले. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सिनूच्या मृतदेहाची पाहणी केली.