अहमदनगर जिल्हा गुंडांच्या हवाली केलाय का?
‘कामातुराणां न भयं न लज्जा!’ या प्रसिद्ध सुभाषितामध्ये बदल करून ‘गुंडांनां न भयं न सज्जा’ {सजा} असेच यापुढे म्हणावे लागेल, अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यात हल्ली पहायला मिळते आहे. पोलीस खात्याचा दरारा राहिला नाही, कायद्याची भिती वाटत नाही, अशा गुंडांच्या तर हा ऐतिहासिक नगर जिल्हा हवाली केला नाही ना, अशी शंका या जिल्ह्यातील सामान्य जनता व्यक्त करीत आहे. केडगाव आणि जामखेडमध्ये घडलेल्या घटनांवरून नगरचे बिहार नाही काय या नगरात धरतीवरचे स्वर्ग अवतरले का, आणि असल्या हत्याकांडांमध्ये भविष्यात आणखी किती बळी जाणार आहेत, या प्रश्नांची उत्तरे शनिवारी काही वेळ ‘सिव्हिल’मध्ये कोंडून ठेवलेले पालकमंत्री देतील का?
केडगाव आणि जामखेडमध्ये झालेल्या हत्याकांडाला अनेक प्रकारचे कंगोरे असतील. वेगवेगळी कारणे असतील. मात्र एकमेकांच्या जीवावर उठलेल्या या ‘गुंडगिरी’चा अंत करण्यासाठी या जिल्ह्यात खमक्या पोलीस अधिकारी आणण्यात आडकाठी घालणारे नक्की कोणकोण ‘झारीतले शुक्राचार्य’ आहेत, याचाही यानिमित्ताने शोध घेण्याची गरज आहे. तूर्त पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा या दोघांनी जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यात एसपी शर्मा यांची बदली केल्यानंतर पुन्हा दुसरे एसपी कोण, हे त्रांगडे आहेच. केडगाव हत्याकांडाचा तपास सुरु आहे किंवा झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तोच जामखेडला हत्याकांड झाले. त्यामुळे या हत्याकांडाच्या तपासाला गती देणे, आरोपी लवकरात लवकर जेरबंद करणे यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. मात्र हे करत असतांना पोलीस आणि कायदा या दोन्हींचाही धाक, दरारा समाजात निर्माण करण्यात ही यंत्रणा यशस्वी होईल, तोच खरा सोन्याचा दिवस म्हणावा लागेल.
डिजिटल बोर्डचे बळी?
योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांची झालेली हत्या किरकोळ कारणातून घडल्याचे बोलले जात आहे. डिजिटल फ्लेक्स बोर्डवरून हे हत्याकांड घडविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये या दोघांना जीव गमवावा लागला. परिणामी राळेभात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गेल्या वर्षी उल्हास माने यांच्या तालमीतील मुलांबरोबर राजकीय फलक लावल्याच्या कारणावरून या दोघांचे अन्य तरुणांशी भांडण झाले होते. याच कारणावरून शुक्रवारी {दि. २८} सायंकाळी साडेसहा वाजता हे हत्याकांड घडले.
पालकमंत्रीसाहेब, हे वागणं बरं नव्हं!
जामखेडसह जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था ढासळण्यास आणि गुंडांच्या टोळ्या निर्माण होण्यास पालकमंत्री प्रा. राम शिंदे हेच जबाबदार आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. यातून पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे. दरम्यान, ‘मी या गावाचाच नाही’, असे घेणे देणे नसल्यासारखे पालकमंत्री शिंदे यांचं ‘हे वागणं बरं नव्हं’ अशी टीका केली जात आहे. याचेही पालकमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे.
