Breaking News

डिजीटल सातबारा उतार्‍याचे उद्या वितरण

कर्जत-जामखेड तालुक्यातील सर्व गावांतील शेतकर्‍यांचा सात-बारा उतारा आता डिजीटल स्वाक्षरीने मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना यापुढे उतार्‍यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नसल्याची माहिती कर्जतचे प्रांतअधिकारी अर्चना नष्टे यांनी दै. लोकमंथनशी बोलताना दिली.

शासनाने सर्वच गोष्टी आता ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍याच्या शेतीचा उताराही ऑनलाईन करण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व महसुलमंत्री चद्रकांत पाटील आणि महसूल विभागाने ठेवले होते. त्यानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील सर्व गावांतील शेतकर्‍यांच्या शेतीचा सात-बारा उतारा डिजीटल करण्याचे प्रयत्न शासनाच्या महसूल विभागाने केले होते. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्याने कर्जत-जामखेड तालुक्यातील अपवाद वगळता काही गावे डिजीटल होऊ शकले नाहीत. मात्र कर्जत-जामखेड तालुक्यातील 99 टक्के गावे डिजीटल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हयात कर्जत विभाग अग्रेसर ठरला आहे. काही गावे मोठी असल्याने तांत्रीक अडचणी आल्या, अन्यथा कर्जत विभाग राज्यात या कामात शंभर टक्के यश प्राप्त करू शकला असता, असा विश्‍वास अर्चना नष्टे यांनी व्यक्त केला.