वादळी वारे व अवकाळी पावसाने आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान
पाथर्डी/विशेष प्रतिनिधी - गेल्या दोन दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात ठिकठिकाणी झालेले वादळी वारे व अवकाळी पावसाने आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावला गेला आहे. यातील सर्वच शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे तर आहेच. शिवाय ज्या शेतकर्यांनी त्यांच्या बागांचा विमा उतरवला आहे, निदान त्यांना तरी विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई अदा करावी या प्रतिक्षेत वादळग्रस्त शेतकरी मदतीची वाट पाहात आहे. तालुक्यातील सुसरे येथील शेतकरी सुनिल शिंदे यांची दोन एकरावर, केशर जातीच्या आंब्याची बाग आहे. त्यासाठी शिंदे यांनी यंदा मोठा खर्च केला होता. अंतर्गत मशागत, खते, कीटकनाशके, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची औषधे आदि बाबींचे नेटके नियोजन केल्यामुळे त्यांच्या बागेतील आंब्यांची झाडे फळांनी लगडली होती. कष्टाला फळ मिळण्याच्या मार्गावर असतानाच अचानक वादळी वार्यांसह पाऊस पडल्याने त्यांच्या बागेतील झाडांवरची फळे मोठ्या प्रमाणावर गळून पडली. उरलेल्या कैर्या नगण्य प्रमाणात असून त्यांपासून झालेला खर्चही वसूल होण्याची सुतराम शक्यता नाही. यामुळे नैराशाने खचलेल्या शिंदेंनी दै. लोकमंथनशी बोलताना, सदर बागेचा विमा उतरवला असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु त्यांना त्याविषयी शाश्वती वाटत नसल्याचे अतिशय क्षीण आवाजात त्यांनी सांगितले. यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी अशा नुकसानींचे पंचनामे करणे गरजेचे आहे. सुदैवाने गारपीट झाली नाही म्हणून याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आंबा उत्पादकांशी प्रतारणा केल्यासारखे होईल.