Breaking News

‘निळवंडे’चा प्रश्न सेना भाजप सरकार सोडविणार : शिवतारे


राहुरी ता. प्रतिनिधी  - निळवंडे धरणाचा पाटपाणी कालव्याचा प्रश्न दोन वर्षांत सोडविणार आहोत. ठेकेदारांच्या दृष्टचक्रात हे धरण अडकल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. त्यातलाच हा निळवंडे प्रकल्प आहे. आज ४५ वर्षानंतरदेखील या धरणाचा सुटला नाही, हे दुर्देव आहे. हा प्रश्न सेना भाजपा सरकार सोडवणार, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री शिवतारे राहुरी तालुक्यातील कणगर बुद्रुक येथे शिवसेनेच्या निळवंडे पाटपाणी मेळाव्यात बोलत होते. शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, गोविंदराव मोकाटे आदी यावेळी उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, अनेकांनी आमदारकी व खासदारकी निळवंडेचे राजकारण करुन मिळविल्या. हा प्रश्न भिजत ठेवला. पण लक्षात ठेवा, जनता त्यांना याच पाण्यात गटांगळ्या खायला लावल्याशिवाय राहणार नाही. राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी हे लक्षात घ्यावे. येथील जनता दोन्हीही बाजूने आजवर चाळीस ते पंचेचाळीस वर्षे मार खात आली आहे. हजरो कोटींचे नुकसान झाले. २००३ ते २०१४ या ११ वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. या काळात त्यांनी सुधारित मान्यता दिली नाही. ती आम्ही २०१६/१७ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. तेव्हा खर्चाचा मार्ग मोकळा झाला. २०१४ साली आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा आम्हाला कळाले. मागील सरकार किती घोटाळेबाज होते, हे आजच्या जनतेच्या लक्षात आले आहे. हल्लाबोलवाल्यांनी ‘डल्लाबोल’चे काम त्यावेळी केले. आम्ही मात्र त्यांच्या काळात रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे काम केले. निळवंडेचे काम पुढील दोन वर्षांत पूर्णत्वास नेऊ. जे मागील ४५ वर्षांत झाले नाही ते करुन आम्ही दाखवणार आहोत. आमच्या भागातील धरण पूर्ण होऊन हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. धरण तयार आहे. फक्त कालवे करायचे बाकी आहेत. त्यामुळे ते होणारच. शेतीच्या पाण्याबरोबर औद्योगिक संस्था आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देवू, असे आश्वासन रावसाहेब खेवरे यांच्या भाषणाचा धागा पकडत शिवतारे यांनी यावेळी दिले.

लोकप्रतिनिधी सजग नसतो. तो कुटुंबप्रमुखाप्रमाणे वागत नाही म्हणून विकास रखडतो. पाण्याच्या पळवापळवीवर भाष्य करताना राज्यमंत्री शिवतारे यांनी सांगितले, नागरिकरण वाढत असल्याने पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी धरणसाठ्यातील १५ टक्के पाणी पिण्यासाठी तर १० टक्के औद्योगिककरिता असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे पाण्यावरुन राजकारण वाद नकोय. पळवापळवी होणार नाही. या भागातील लोकांनी राजकारण व स्वार्थापुढे जाऊन सार्वत्रिक विचार करत शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन पुढे जाण्याचा निर्धार केला तरच प्रश्न सुटतील. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांबरोबर आहे. यावेळी उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनीदेखील यावेळी घणाघाती भाषण करुन निळवंडे प्रश्न चिघळत ठेवणा-यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ४५ वर्षांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आजोबांच्या काळात नारळ फुटला. पण नातवाच्या काळातदेखील हा प्रश्न सुटत नाही. ७ कोटी खर्चाचा प्रकल्प आज २ हजार ३७० कोटी रुपयांपर्यंत गेला. अनेक वर्षे प्रलंबित राहणारा जगाच्या पाठीवर एकमेव प्रश्न म्हणजे निळवंडे कालवा होय. या भागात पाणी पोहचले नसल्याने येथे बेरोजगारी वाढली. शेती ओसाड झाली. लोक बाहेरगावी कामाला जातात. अनेकांनी भांडवल केले. पण शिवसेना हा प्रश्न सोडविल्याशिवाय हटणार नाही. काहींच्या भूलथापांना बळी पडू नका. येथे बेरोजगारी वाढली. तालुक्याच्या एक एक संस्था बंद पाडण्याचे व तालुक्याचे वाटोळे करण्याचे काम येथील लोकप्रतिनिधींनी केले आहे. तनपुरेंनी २५ वर्षे राजकारण केले. तर आजच्या प्रतिनिधीनेही तेच काम पुढे चालू ठेवले. आश्वासनाशिवाय काहीच यांच्याकडून झाले नाही. आमदार हा कसा असतो, हे माझ्या रुपाने दाखवून देणार आहे. आगामी २०१९ ला निवडणूक रिंगणात उतरुन शिवसेना लोकप्रतिनिधींना जागा दाखवून देईल.

यावेळी नगर तालुक्यातील जि. प. सदस्य गोविंद मोकाटे, पाटपाणी कृती समितीचे सदस्य दादासाहेब पवार, सेनेचे स्थानिक सुहास उ-हे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी अनेक युवकांनी राज्यमंत्री शिवतारे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. कणगर येथील निळवंडे पाटपाणी मेळाव्यास विजय शिरसाठ, सुहास उ-हे, नवनाथ मुसमाडे, गहिनीनाथ शेटे, संतोष गाढे, नारायण घाडगे, दत्तात्रय बलमे, गणेश जाधव, नवनाथ धनवडे, किरण गव्हाणे, बापू नालकर, अक्षय घाडगे, गणेश शेटे, गोकुळ शेटे, अनिल शेटे, गोरख उ-हे, रमेश गाढे आदींसह पंचक्रोशीतील व निळवंडे लाभधारक क्षेत्रातील हजारो शेतकरी उपस्थित होते.