‘त्या’ शकुनीमामांनी सहनशीलत्तेचा अंत पाहू नये : निखाडे
कोपरगांव शहरहिताला प्राधान्य देत एक कर्तव्यदक्ष आ. म्हणून स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे-शिर्डी या पिण्याच्या पाणी योजनेतून कोपरगांवला २६० कोटी रूपये खर्चाच्या प्रशासकीय कामाची मंजुरी मिळविली. मात्र स्वयंघोषित विकास पुरुषाने राजकीय स्वार्थापोटी त्याबाबतची निविदाच बोगस असल्याचा जावईशोध लावला. हे ‘शकुनीमामा’च निळवंडेच्या पाण्याला विरोध करीत आहेत आणि त्यांना काही महाभाग साथ देत आहेत. त्यांनी आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू, नये असा निर्वाणीचा इशारा कोपरगांव नगरपालिका पाणीपुरवठा समितीचे सभापती स्वप्नील निखाडे यांनी दिला.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री प्रा. राम शिंदे आदींच्या सहकार्याने कोपरगांवकरांची तहान भागविण्यासाठी आ. कोल्हे यांनी शिर्डी साईबाबा शताब्दी सोहळयाच्या धर्तीवर निळवंडे ते शिर्डी पिण्याची पाणी योजना थेट कोपरगांवपर्यंत वाढवून घेतली. त्यासाठी २६० कोटी रुपये खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता घेतली. त्याचा विरोधकांना पोटशूळ उठला आहे. विधानसभा निवडणुकीचे दिवास्वप्न त्यांना पडू लागल्याने एकीकडे कोपरगांवच्या पाण्याला आडवे येणारे आम्ही ‘नतद्रष्ट’ नाही, असा एकीकडे प्रचार करायचा आणि दुसरीकडे स्वतःचीच सत्ता असलेल्या कोपरगांव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत निळवंडेचे पाणी कोपरगांवकरांना पिण्यासाठी देऊ नये, असा ठराव करायचा, हा दुतोंडी कावेबाजपणा कोपरगांवकरांनी ओळखला आहे. आ. कोल्हे यांच्या विकासाचा झपाटा पाहिल्यावर त्याच पुन्हा विजश्री खेचून आणणार आहेत, याचा धसका विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळेच ते राजकीय हेतुने प्रेरित होऊन बिनबुडाचे आरोप करीत आहेत. अशा कुविचारांना जनतेने थारा देऊ नये, असेही निखाडे यांनी पत्रकात म्हटले आहे.
