Breaking News

अग्रलेख - तपासयंत्रणेवर मर्यादा की प्रश्‍नचिन्ह


मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात स्वामी असीमानंद यांच्यासह 5 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तपासयंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. मक्का मशीद बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष सुटत असेल, तर मग हा बॉम्बस्फोट कुणी केला असा प्रश्‍न निर्माण होत आहे. यापूवी देखील मालेगाव येथे सन 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने या प्रकरणातील 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. परंतु, यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. यामुळे आठ आरोपींची सुटका झाली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एटीएस व सीबीआय सबळ पुरावे जमा करू शकली नाही. असे असतांना पुन्हा एकदा मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण समोर येत आहे. देशांतील अनेक संवदेनशील प्रकरणांची जी चौकशी सुरू आहे, त्यात पुराव्या अभावी आरोपी निर्दोष सुटण्याची शक्यता मोठया प्रमाणात वाढत आहे. यामुळे तपासयंत्रेवर प्रश्‍नचिन्ह उमटणे साहजिकच आहे. हैदराबादमधील मक्का मशीदीतील 18 मे 2007 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता, व 58 जण जखमी झाले होते. त्यानंतर स्वामी असीमानंदासह अनेकांना अटक क रण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांनतर तब्बल 11 वर्षांनतर या प्रकरणांचा निकाल येतो, आणि तेही आरोपी निर्दोष. या अकरा वर्षात तपासी यंत्रणा काय करत होत्या. या अकरा वर्षांत तपासी यंत्रणा पुरावे जमा करू शकल्या नाहीत का? जर या प्रकरणांत सवामी असीमानंद निर्दोष असतील तर मग नेमके आरोपी कोण? बॉम्बस्फोट कुणी घडवून आणला? त्यामागे उद्देश काय? यासर्व प्रश्‍नांची उत्तरे तपासी यंत्रणा शोधू शकलेल्या नाहीत. तपास यंत्रणेवर राजकीय व्यवस्थेचा काही प्रभाव, दबाब आहे का? का पुरावे असतांना देखील राजकीय दबावापोटी तपास यंत्रणा हे पुरावे न्यायालयासमोर मांडू शकल्या नाहीत. असे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहे. या प्रकरणात एकूण 160 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. हैदराबाद बॉम्बस्फोटांमध्ये 10 आरोपी होते. हे सर्व जण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत. स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी, लक्ष्मणदास महाराज, मोहनलाल रतेश्‍वर व राजेंद्र चौधरी अन्य चार जण या प्रकरणात आरोपी होते. आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे दोघे अजूनही फरार आहेत. तर सुनील जोशींचा गोळीबारात मृत्यू झाला होता. तब्बल 11 वर्ष या प्रकरणांचा तपास आणि सुनावणी सुरू होती. मात्र तपासी यंत्रणेला पुरावे मिळत नाही? केसचा उलगडा होत नाही. यावर प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात अर्थ नाही. कारण अद्यावत तंत्रज्ञानामुळे आरोपींपर्यंत पोहचणे सहज शक्य होत आहे. मात्र यात राजकीय हस्तक्षेपांचा वास यायला वाव नक्कीच आहे. कडव्या विचारसरणींच्या संघटनाकडून असे अनेक हल्ले होत आहे. मात्र या सर्वांच्या मुळाशी नेमका कुणाचा हात आहे, हे स्पष्ट होत नाही. किंवा ते स्पष्ट होऊ दिले जात नाही. राज्यात क्रॉमेड पानसरे, डॉ. दाभोळकर यांची हत्या होऊन देखील आरोपी सापडले नाहीत. अटकेत असलेले आरोपी जामीनावर बाहेर आहेत. संशयाची सुई सनातन या संघटनेकडे असली, तरी अद्यापही मास्टरमाईंड अटकेत नाही. त्यामुळे तपासयंत्रणेवर नेमका कुणाचा दबाव आहे. तपाययंत्रणेला नेमक्या कोणत्या मर्यांदा येत आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. कारण सबळ पुराव्याअभावी अनेक खटल्यांचा निकाल रखडला आहे, अनेक आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. ही अ तिशय चिंतनीय बाब आहे.