Breaking News

राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांना जामखेडमध्ये सुरूवात


जामखेड, नृत्य सादरीकरणातील लक्षवेधी दिलखेचक अदाकारी, धमाल नृत्याला मिळणारी तरुणाईसह महिलांची उत्स्फूर्त दाद आणि संगिताच्या तालावर लहान-थोरांची कलाकारांसह थिरकणारी पावलं... जामखेडकरांसाठी अनोखी पर्वणी असलेल्या जामखेड महोत्सवाची काल शानदार सुरूवात झाली. जामखेड युथ फेस्टिव्हल सांस्कृतिक कला मंच आणि श्री. समर्थ प्रतिष्ठान आयोजित केलेल्या जामखेड महोत्सवाचा पहिला व दुसरा दिवस गाजला तो लावणी, मुजरा, क्लासिकल, हीपॉप, फ्री स्टाईलसह वेगवेगळ्या नृत्यांचे बहारदार सादरीकरणाने सुरूवात झाली. लक्षवेधी नृत्यांना जामखेडकरांनी दिलेली दाद कलाकारांसाठी बळ देणारी ठरली.

ग्रामीण भागातील व महाराष्ट्रातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा या हेतुने येथिल जामखेड युथ फेस्टिव्हल सांस्कृतिक कला मंच व श्री. समर्थ प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड महोत्सवाच्या माध्यमातून दि. 30 मार्च पासून भव्य तीन दिवस राज्यस्तरीय वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धांना सुरूवात झाली. दोन दिवस झालेल्या नृत्य स्पर्धांमध्ये दि. 30 मार्च रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज बी. एड. कॉलेज येथील खुल्या सभागृहात या स्पर्धांचे जामखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने सुरुवात झाली. 

लहान गटातील 53 कलाकारांनी आपल्या गाण्याच्या ठेक्यावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचा लहान गटातील निकाल पुढील प्रमाणे लागला. राज्यस्तरीय लहान गटात, प्रथम क्रमांक, राजश्री मदन भोसले (काष्टी), द्वितीय क्रमांक मधुरा कोल्हे (जामखेड), तृतीय क्रमांक साक्षी आंधळे, (बीड) , चतुर्थ क्रमांक विभागून, संस्कृती शेंडगे (जामखेड) व आकांक्षा खेतकर (श्रीगोंदा) या स्पर्धाकांनी मिळविले.
 
तर दि. 31 रोजी देखील मोठ्या गटाची स्पर्धा उत्साहात पार पडली. या मध्ये महाराष्ट्रातील बीड, लातूर, जुन्नर, मालेगाव, नगर, खर्डा, श्रीगोंदा, करमाळा, आष्टी, पुणे या ठिकाणाहून एकूण 32 स्पर्धक सहभागी झाले होते.तसेच आज भव्य अशी समुह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 संघ सहभागी झाले. तर दोन्ही स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ काल रात्री झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीचे श्रीधर सिध्देश्‍वर, अविनाश बोधले, ओंकार दळवी, दिपक तुपेरे, जितेंद्र आढाव, सागर चौरे, कल्याण जगताप, आनंद गाडेकर, मोरेश्‍वर राजगुरू, प्रलेश बोरा, अमोल कदम, अमित पिपाडा, ज्ञानेश्‍वर कोळेकर, विजय जाधव, पवन राळेभात, धनंजय पवार यांनी परीश्रम घेतले.