Breaking News

गोदातटी जाणवताहेत दुष्काळाच्या झळा! रांजणगाव देशमुखला टँकरची प्रतीक्षा


कोपरगाव तालुक्याला गोदावरीचा विस्तीर्ण तट लाभलेला आहे. यामध्ये गोदावरी कालवे, पालखेड, नांदूर मध्मेश्वर कालवे आदींचा समावेश आहे. मात्र ही संपदा तालुक्यातील जनता, पशुधन आणि शेतीची तहान भागविण्यास कमीच पडत आहे. दुष्काळाच्या चटक्यात तालुक्यातील पशुधन मात्र कसे बसे टिकून आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच गोदावरीच्या तिरावर दुष्काळाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. 

तालुक्यात ६९ हजार मोठी जनावरे आहेत. तर लहान जनावरांत शेळ्या, मेंढ्या अशी ४४ हजार जनावरे आहेत. तर घोडे, गाढवांची संख्या २५ हजार इतकी आहे. साधारण १ लाख १२ हजार पशुधन तालुक्यात आहे. यातील मोठ्या जनारांना प्रत्येकी ४० लिटर तर लहान जनावरांसाठी प्रत्येकी २० लिटर पाण्याची दररोज गरज भासते. यावर्षी मूरघासाची लागवड पशुपालकांनी जास्त प्रमाणात केली आहे. त्यामुळे अद्यापतरी चारा टंचाई भासलेली नाही. याशिवाय तालुक्यातील कामधेनू दत्तक गावांत पोहेगाव, रांजणगाव देशमुख, कोळपेवाडी, सवंत्सर, चासनळी, येसगाव आदी गावांना पशुधन विभागाने मूरघास बियाणाचे वाटप केलेले आहे. यातील रांजणगाव देशमुख गावाला सध्या पाणी समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे या गावाने टँकर सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप ती अद्याप मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.

ऊन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिके करपली आहेत. विहीरींचे पाणी तळाशी खेळायला लागले आहे. त्यामुळे पुढील महिन्यांत अनेक गावांना पाणी समस्या सतावण्याची चिंता आहे. टँकरसाठी प्रशासनाच्या चाकोरीत विहिरीत साचलेले पाणी आडवे येण्याची तशी भिती आहे. त्याचा फटका पशुधनाला बसणार आहे. पशु-पक्ष्यांसाठी पानवठे निर्मितीबाबत वनविभागही उदासिन आहे. त्यामुळे पानवठेही कोरडे पडलेले आहेत.

अन्य तालुक्यांप्रमाणे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. यातून दर महिन्याला खेळते भांडवल मिळत आहे. खुराक वजा जात यातून घर खर्चासाठी चांगले पैसे मिळत असले तरी सरकी आणि पेंडीचे वाढते भाव आणि प्रतिलिटर २७ रुपयांवरून १९ रुपयांवर आलेले दुधाचे भाव यामुळे तालुक्यातील दूध उत्पादक मेटाकुटीला आला आहे. पशुधन जगविण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दुसऱ्या बाजूला कत्तलखाने या पशुधनाला कशी कात्री लावत होते, याचा प्रत्यय तालुक्याला आला. दीड महिन्यांपूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी गोमांस पकडण्यात आले. यावर तालुक्यातून जनतेच्या आक्रोशाला पोलिस प्रशासनाला सामोरे जावे लागले. काहींना निलंबितही करण्यात आले. यामुळे अंधारातील कत्तलखाने उजेडात आले.