Breaking News

पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करा सायखिंडी ग्रामस्थांची मागणी

संगमनेर/प्रतिनिधी - तालुक्यातील सायखिंडी शिवारात यावर्षीच्या तीव्र उन्हाळ्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत संपूर्णपणे आटले आहेत. परिसरात कुठेच पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे व पाळीव जनावरांचे पाण्याविना प्रचंड हाल सोसावे लागत आहे. दरम्यान, सायखिंडीच्या ग्रामस्थांनी मार्च महिन्यामध्ये तहसीलदारांना टँकर सुरु कारण्याबाबतच प्रस्ताव दिलेला आहे. मात्र यासंदर्भात अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. लवकरात लवकर टँकर सुरु करावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. 

सायखिंडी या गावात एक हंडा पाण्यासाठी महिला आणि मुलांना रोज ३ ते ४ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनीदेखील गावातील पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत टँकर सुरु झाले नाही. दोन दिवसांच्या आत जर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही तर सायखिंडीचे ग्रामस्थ एमआयडीसीसमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर सायखिंडीचे सरपंच नवनाथ शिंदे, उपसरपंच शशिकांत गांडोळे, अमोल गोर्डे, शिवाजी गडकरी आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.