Breaking News

दखल - मंत्रीच लागले फसवणूक करायला

वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून खोटी छायाचित्रं काढता येतात. त्यातून ती अस्सल असल्याचं दाखविता येतं. परंतु, कधी कधी ते अंगलट येतं. अमेरिकेवर अल-कैदा या अतिरेकी संघटनेनं जेव्हा हल्ला केला, तेव्हा त्याची जगभर चर्चा चालू झाली. जगाच्या दृष्टीनं ही बातमी महत्वाची होती. त्याचं चांगलं छायाचित्र मिळवून ते छापणं म्हणजे वाचकांना वेगळं काही देण्याचा प्रयत्न होता. पूर्वी आतासारखं संगणक नव्हते. फॅक्स नव्हते. त्या काळीही एका कुस्ती स्पर्धेचं छायाचित्र थेट विमानानं आणून ते छापण्याचा वेगळेपणा एका वृत्तपत्रानं केला होता. 

इतरांपेक्षा आपण पुढं आहोेत, हे दाखवून देण्यात ते वृत्तपत्र कायम अग्रेसर असायचं. त्याच वृत्तपत्रानं अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दोन विमानं कशी हल्ला करायला आली आहेत, त्याचं छायाचित्र छापलं. एका वाचकानं ते पाठविल्याचं संबंधित वृत्तपत्रानं जाहीर केलं होतं. स्पर्धक वृत्तपत्रानं वर्ल्ड ट्रेड सेंटरची दिशा, विमानाची दिशा आणि हल्ल्याची दिशा यातील तफावत दाखवून ते छायाचित्र कसं बनावट आहे, हे दाखवून दिलं होतं. संबंधित वृत्तपत्राला त्याबाबत खुलासा करावा लागला होता. अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्यात आली, तेव्हा मोहन बने यांनी काढलेलं आठ कॉलमी छायाचित्र गाजलं होतं. त्यानंतर मुंबईवर जेव्हा अतिरेक्यांनी हल्ला केला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर काढलेलं अजमल कसाबचं छायाचित्र देश-विदेशातील सर्वंच वृत्तपत्रांनी वापरलं होतं. संबंधित छायाचित्रावर त्या वृत्तपत्राची मालकी असल्यानं तेव्हा अन्य वृत्तपत्रांना कशा नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या, हा अनुभव फार जुना नाही.
काही छायाचित्र त्याच्यातील वेगळेपणानं जशी लक्षात राहतात, तशीच काही छायाचित्र मिक्सिंग करून टाकल्यामुळं ती वादग्रस्त होतात. खोट्या छायाचित्रांचा वापर आपल्या प्रसिद्धीसाठी जसा केला जातो, तसाच इतरांच्या बदनामीसाठीही केला जातो. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये कुपोषणाचं चित्र किती गंभीर आहे, हे दाखविण्यासाठी काँग्रेसनं जे छायाचित्र वापरलं होतं, ते एका आफ्रिकन राष्ट्रातलं होतं. असाच प्रकार भाजपनंही केला होता. श्रीलंकेतील एक छायाचित्र दाखवून काँग्रेसच्या काळात देशाची अवस्था कशी आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. छायाचित्राचा जसा चांगल्या कारणासाठी वापर केला जाऊ शकतो, तसाच इतरत्र घडलेल्या घटना आपल्याच देशांत घडल्या, असं दाखवून समाजमन प्रक्षुब्ध करण्यासाठी ही काही घटना, छायाचित्रांचा वापर केला जातो. मुझफ्फरनगरमध्ये दंगली भडकवण्यामागं भाजपच्या आमदारांचा हात होता. तसा गुन्हाही त्यांच्यावर दाखल झाला. संगीत सोम असं त्यांचं नाव. त्यांनी पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील घटना यूट्युबवर दाखवून भारतात मुस्लिम कसे हिंदूवर अत्याचार करतात, असा अपप्रचार केला होता. त्यातून मुझफ्फरनगरची दंगल झाली. दोन समाज दुभंगले. मतांचं धु्रवीकरण झालं. भाजपला लोकसभेत व विधानसभेत सत्ता मिळाली. परंतु, दंगलीत पन्नासहून अधिक जणांचा बळी गेला. पन्नास हजार लोक विस्थापित झाले. कित्येक महिलांवर बलात्कार झाला. आता तर मुझफ्फरनगर दंगलीचे सर्व गुन्हे मागं घेतल्यानं एवढ्या गंभीर गुन्ह्यच्या मुळापर्यंत जाऊन दोषींना शिक्षा करण्याचं कामच राहिलं नाही.
केंद्र सरकारनं मागं एका देशाचं छायाचित्र प्रसिद्ध करून ते भारताचं असल्याचं म्हटलं होतं. त्याबाबत आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. कोणतीही गोष्ट गांभीर्यानं घेतली नाही, की काय होतं, हे वारंवार अनुभवयाला येऊनही मंत्री आणि सरकार त्याबाबत काहीच धडा घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशताील सर्व गावांमध्ये वीज पोचल्याचा गवगवा केला. वीज पोचून उपयोग नसतो. रात्रीच्या वेळी किती गावांत वीज राहते, हा संशोधनाचा मुद्दा आहे. दिवसा तरी किती गावांतील लोकांचं अंग होरपळून काढणार्‍या उन्हात विजेमुळं दिलासा मिळतो, याची चौकशी केली, तरी वस्तुस्थिती कळून येईल. देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याच्या मोदी यांच्या घोषणेनंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. देशात जे मोजके कार्यक्षम मंत्री आहेत, त्यात या गोयल यांचा समावेश होत होता. परंतु, नेत्यांच्या पुढं पुढं करता करता त्यांचं भान सुटत चाललं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सौर ऊर्जाप्रकल्पाचं काम नियमबाह्य कसं दिलं, यावरून हेच गोयल महाशय अडचणीत आले होते. आताही गोयल यांनी टाकलेल्या फोटोमुळं मोदी यांची अडचण वाढली आहे. या फोटोवरुन रविवारी युझर्सनी पियूष गोयल यांना मोठया प्रमाणात ट्रोल केलं. गोयल यांनी रात्रीच्यावेळी उपग्रहाच्या माध्यमातून घेण्यात आलेले भारताचे दोन फोटो ट्विटरवर पोस्ट केले होते. सर्व भागात वीज पोहोचल्यानंतर भारत आता कसा दिसतो व आधी कसा दिसायचा हे सांगणारे ते दोन फोटो होते. या फोटोंसोबत मोदींच्या नेतृत्वाखाली ठरवलेल्या मुदतीआधीच भारतानं सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याचं लक्ष्य गाठल्याचा उल्लेख होता. भारतीयांच्या जीवनातून अंधकार दूर करून नवीन, शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा संदेश त्यांनी फोटोखाली लिहिला होता.
पियूष गोयल यांच्या ट्विटनंतर काही वेळातच ट्विटर युझर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारण गोयल यांनी जे फोटो ट्विट केले होते, ते फार जुने होते. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासानं आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून रात्रीच्यावेळी भारत कसा दिसतो, त्याचे फोटो काढले होते. पहिला फोटो 2012 सालचा होता. दुसरा फोटो नासानं मागच्या वर्षी प्रसिद्ध केला पण तो 2016 सालचा होता. देशातील सर्व भागात वीज पोहोचवल्याचा दावा करतानाच जुने फोटो पोस्ट करून फसवणूक केली म्हणून युझर्सनी गोयल यांना खूप टोले लगावले. दरवर्षी दिवाळीनंतर हा फोटो पोस्ट केला जातो. भारतीय जनता पक्ष मोठया प्रमाणावर फेक न्यूज आणि फोटो शॉपवर अवलंबून आहे असं एका युझरनं म्हटलं होतं. एका युझरनं उपहासानं अभिनंदन करताना तुमच्या मसोशल मीडिया टीमफला फोटोचा स्त्रोत आणि तारीख दोनदा तपासून घ्यायला सांगा असा सल्ला दिला आहे. त्यातून उत्साही मंत्र्यांनी बोध घेतला, तर बरं होईल.