Breaking News

विजय शुगरची विक्री निविदा काढण्यास संचालकांची मंजुरी


सोलापूर, शिवरत्न उद्योग समूहाच्या करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगरची संपूर्ण मालमत्ता विक्री करण्यासाठी निविदा काढण्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी मंजुरी दिली. झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय झाला. त्याचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आहे. मूल्यांकनाचा आकडा ठरला, की कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही निविदा क ाढण्यात येईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली. 

मध्यवर्ती बँकेने हा कारखाना उभारणीसाठी 113 कोटी 60 लाख 75 हजार रुपयांचे मुद्दल कर्ज दिले. त्यावर आतापर्यंत 65 कोटी 54 लाख 18 हजार रुपयांचे व्याज झाले. एकूण 179 कोटी 14 लाख 70 हजार रुपयांची कारखान्याकडे बँकेची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकेने कायदेशीर लढा दिला. ’सरफे सी’ कायद्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा बँकेच्या ताब्यात दिला. त्यानंतर ही विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. पुण्याच्या वकिलामार्फत कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येईल. त्यानंतर जाहीर निविदा प्रसिद्ध होणार असल्याचेही पाटील म्हणाले. झालेल्या बैठकीसाठी संचालक उपस्थित होते. त्यांच्या पुढे एकूण 24 विषय होते. आयत्या वेळच्या विषयांमध्ये विजय शुगरच्या विक्रीचा प्रस्ताव होता. त्यावर चर्चा होऊन लगेच मंजुरी देण्यात आली. या सभेसाठी मोजकेच संचालक उपस्थित होते. आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, संचालक सुरेश हसापुरे, भारत सुतकर आदींचा त्यात समावेश होता.