Breaking News

मक्तेदारांना अधिक रकमा, बिलांच्या चौकशीची मागणी


सोलापूर, पाण्याच्या टँकरच्या बिलात घोळ असल्याचे पुढे आले असतानाच गुरुवारी नव्याने महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयाच्या बाबतीत संशय निर्माण झाला आहे. मक्तेदारांना दिलेल्या बिलाची चौकशी करा, यात गैरव्यवहार असण्याची शक्यता आहे, असे पत्रच सत्ताधारी असलेले सभागृह नेते संजय कोळी यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले आहे. 

शहरात विविध ठिकाणी विकास कामे केल्याने मक्तेदारांना 146 कोटी बिले अदा करणे आहे. ते त्वरित द्यावे, अशी मागणी मक्तेदार करत आहेत. बिले दिले जात नसल्याने मक्तेदारांनी महापालिकेचे काम थांबवले आहे. वार्डवाईज व भांडवली कामे मक्तेदार घेत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे. मक्तेदारांना टप्प्याटप्प्याने बिले अदा केली जात आहेत. ते करत असताना मुख्य लेखापाल कार्यालयातील गोंधळ समोर येत आहे. एका मक्तेदारास पहिल्या टप्प्यात 1 लाख 70 हजार रुपयांच्या बिलापैकी 1 लाख दिले, दुसर्‍या टप्प्यात केवळ 70 हजार देणे आवश्यक असताना पुन्हा 1 लाख 70 हजार दिले जातात. एका मक्तेदारास 16 लाख रुपये जादा देण्याचा प्रयत्न झाला तर एका मक्तेदारास 30 हजार रुपये जादा दिल्याचे पुढे आले आहे. ही बाब सभागृह नेते कोळी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली असून त्यावर चौकशी होण्याची शक्यता आहे.