Breaking News

अवकाळी पावसात शाळेची इमारत कोसळली; वार्‍याने पत्रे उडाले

श्रीगोंदा तालुक्यात काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शहराजवळील भोळे वस्ती येथील जि.प. प्राथमिक शाळेचा काही भाग कोसळला, तर शाळेवरील पत्रे उडून गेले. त्याचबरोबर शेडगाव येथील बाळासाहेब भोसले या शेतकर्‍याच्या 7 शेळ्या या वादळी वारा व पावसामुळे दगावल्या आहेत. पावसाने वादळासह हजेरी लावल्याने अनेक शेतकर्‍यांची त्रेधा उडाली. कांदा, हरबरा पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. तर वादळाने द्राक्षे, कलिंगड, खरबूज पिकांना काही प्रमाणात हानी पोहचली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वादळ सुरु झाले, तर नंतर पावसाने तालुक्याच्या काही भागात जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा पसरला होता. मात्र कांदा उत्पादक शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. 

श्रीगोंदा शहरासह, आढळगाव, अजनूज, पेडगाव, पारगाव, बेलवंडी आदी भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची धावपळ झाली. उघड्यावर असलेला कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ झाली. तर हरभरा आणि काही ठिकाणी उशिरा पेरणी झालेला गहू शेतात उभा असल्याने त्याचे चांगलेच नूकसान झाले. तसेच फळबागांमध्ये द्राक्ष पिकांना काही ठिकाणी जोरदार वार्‍यामुळे नुकसानीचा सामना करावा लागला. कलिंगड़ आणि खरबूज पिकांना पावसाने थोडेफार नुकसान सहन करावे लागणार आहे .
भोळेवस्ती शाळेची इमारत वादळाने पडली, शाळेचे पत्रे उडून गेले, सोळा ते सतरा वर्षांपूर्वी पत्र्यांच्या खोल्या बांधण्यात आल्या होत्या, इमारत जूनी असताना या धोकादायक ठिकाणी शाळा भरत होती. पहिली ते चौथीपर्यंत शाळा भरत होती. सुट्टी असल्याने दुर्घटना टळली. मात्र पुन्हा इमारतीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक शिवाजी शेळके यांनी तातडीने शाळा बांधणीचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली आहे. शाळेच्या इमारतीची पाहणी केंद्रप्रमुख गजानन ढवळे, विस्तार अधिकारी सुरेश ढवळे, नगरसेवक नाना कोथिंबीरे, अशोक आळेकर यांनी केली असल्याची माहिती मुख्याध्यापिका लहाने आणि गोरे यांनी दिली.