Breaking News

जामखेड नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या महागाई भत्यावर अधिकार्‍याचा डल्ला?


नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदांच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याचा फरक नुकताच शासनाने जाहिर केला. जामखेड नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या गोरगरीब कर्मचार्‍यांना आलेल्या महागाई भत्त्याच्या रकमेवर दरोडा टाकण्याची किमया त्या अधिकार्‍याच्या आदेशाने नगरपरिषदेतील दोन बोक्यांनी साधली असल्याची जोरदार चर्चेला जामखेड शहरात उधान आले आहे. फसवणूक झालेल्या काही कर्मचार्‍यांनी संबंधित आधिकार्‍यांवर गून्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे. त्या तक्रार अर्जावर विजय गायकवाड, बाबासाहेब ओव्हळ, सिमा गायकवाड, मंदा मोरे, मिलिंद घायतडक, कल्याण काळे, मधूकर निकाळजे, रामदास गायकवाड, शंकर डाडर, दिलीप डाडर, राजेंद्र माने आदींच्या सह्या आहेत. सत्ताधारी व विरोधक या भ्रष्टाचारासंदर्भात मूग गिळून गप्प आहेत. या प्रकरणाची सत्यता जनतेला कळावी याकरिता जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड नगरपरिषदेच्या चतुर्थ व तृतीय श्रेणीमधील एकून 160 कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याची रक्कम शासनाकडून प्रत्येकी 54 हजार याप्रमाणे नगरपरिषदेच्या खात्यावर जमा झाले. सदर रक्कम प्रत्येक कर्मचार्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यापुर्वी संबंधित आधिकार्‍याने काही कर्मचार्‍यांमार्फत गुरूवार दि.19 एप्रिल रोजी सफाई कामगार कामावर हजर होण्याच्या म्हणजे भल्या पहाटेच्या वेळी महाराष्ट्र बँकेच्या विड्रॉल स्लिपवर साहेबांनी सांगितले आहे असे म्हणून सफाई कर्मचार्‍यांच्या सह्या घेतल्या. त्याच दिवशी कर्मचार्‍यांच्या खात्यावर 54 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. तर काही तासातच चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगारांना कर्मचार्‍यांना 6 हजार तर तृतीय श्रेणीतील कर्मचार्‍यांना 15 हजार रुपये आपल्या खात्यातून काढण्यात आल्याचा मेसेज आला. आपण पैसे काढले नाहीत तरी, आपल्या खात्यातून कसे काय पैसे काढले गेले? याबाबत कर्मचार्‍यांना काहीच उमगेना. मग नगरपरिषदेत चौकशी केली असता, त्या दोन मध्यस्थांनी व साहेबांनी गप्प रहा याबाबत कुणालाच काही सांगू नका असा दम काही कर्मचार्‍यांना दिला असल्याचे समजते. 
यातूनच संबंधित अधिकार्‍याच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे भिंग फुटले. अन् नगरपरिषदेच्या त्या आधिकार्‍याने कर्मचार्‍यांच्या पैश्यांवर डल्ला मारला असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. अन् या चर्चेचे लोण आता सावर्जनिक झाले आहे. ही चर्चा गुन्हा दाखल होणार इथपर्यंत सोशल मिडीयासह चौकाचौकात रंगली खरी पण अजून गुन्हा दाखल झाला नाही.