Breaking News

अण्णा! जरा साभांळून.......

गेल्या आठवड्यात म्हणजे थोर समाजसेवक आणि एकविसाव्या शतकातील गांधी अण्णा हजारे यांचे दिल्लीस्थीत उपोषण सुटण्याची प्रक्रीया सुरू असताना एक बातमी व्हायरल होत होती. या बातमीतून अण्णांचा संघांशी असलेला स्नेहबंध तपशीलात सांगण्याचा प्रयत्न झाला. खरोखर अण्णांचा समोर दिसणारा चेहरा आणि पडद्यामागचा चेहरा लोक म्हणतात तसा वेगवेगळा असेल? लोकांच्या मनात अण्णांबद्दल शंका निर्माण का व्हावी? सरकारशी तडजोड आणि विरोधकांशी व्यवहार ही अण्णांच्या चळवळीचे सुञ आहे असा आरोप अण्णांवर का होतो? 


पेरले तेच उगवते, हा निसर्ग नियम प्रत्येकाच्या दैनंदीन व्यवहाराला लागू आहे. मग ते अण्णांचे आंदोलन असले तरीही. गेली काही दशके महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर सामाजिक क्षेत्रात अण्णा तथा किसन हजारे हे नाव अदबीने आणि आदराने घेतले जाते. निवृतीनंतर हा फौजी समाजाच्या भल्यासाठी रात्रंदिवस राळेगण सिध्दीच्या मंदीरात तपश्‍चर्या करीत आहे. या तपश्‍चर्येतून या देशाला माहितीचा अधिकाराची देण्यात अण्णा नावाचा एक कफल्लक यशस्वी झाला. या पलीकडे जाऊन अण्णा हजारे या व्यक्तीमत्वाचे काम ठळकपणे विचारात घ्यावे असे आहे.
या देशाला लागलेल्या भ्रष्टाचाराची कीड चर्चेत आणून लोकांमध्ये भ्रष्टाचाराविषयी चीड निर्माण करण्यात अण्णांचे आणि फक्त आण्णांचेच योगदान आहे, याविषयी कुणाला शंका असण्याचे कारण नाही. सत्ताधार्‍यांविरूध्द आंदोलनाला धार येण्यासाठी प्रसंगी अण्णांच्या आंदोलनाला मिळत असलेली कुमक या ठिकाणी दुर्लक्षित करता येणार नाही. युतीच्या सरकारमधील शशीकांत सुतार, बबन घोलप, सुरेश जैन अशा काही मंत्र्यांविरूध्द अण्णांनी पुकारलेला लढा महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास बनला. अण्णांनी या तत्कालीन मंत्र्यांच्या विरूध्द सबळ पुरावे जमा करून दिलेला लढा तत्कालीन विरोधकांच्या सहभागाने अधिक तीव्र झाला. त्यानंतर युपीए सरकारच्या कारभाराविरूध्द दिल्लीच्या जंतर मंतरवर पुकारलेले आंदोलन आणि त्या आंदोलनाला तत्कालीन विरोधकांनी पुरवलेली कुमक महत्वाची ठरली. या आंदोलनातून मुख्य हेतू साध्य करता आला नसला तरी देशपातळीवर झालेल्या सत्तांतराला ठरलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण नक्की ठरला. आणि अरविंद केजरीवाल, किरण बेदी हे बाय प्राडक्ट मिळाले हा भाग वेगळा. सत्तांतरानंतर अण्णांना हव ते मिळवण्यात अपयश आले आणि पुन्हा गेल्या महिन्यात आंदोलनाची वेळ आली. यावेळी मात्र अण्णांचे आंदोलन अत्यंत पध्दतशीर संवैधानिकपणे मोडून काढले जाईल अशी व्यक्त होत असलेली अशंका खरी ठरली. हे आंदोलन हाताळणारी सत्ताधारी मंडळी अण्णांचा अभ्यास करून बसली आहे. अण्णांच्या एकूण आंदोलन शैलीचा जवळून अभ्यास केलेल्या या मंडळींनी गेल्या अनेक वर्षांपासून अण्णांच्या सभोवताली माणसांची पेरणी केली आहे, हा भाग अतिशोयोक्तीचा वाटत असला तरी सत्य आहे. या माणसांनी अण्णांसोबत राहून अण्णांचे आंदोलन कमकुवत करण्याचा बी प्लन नेहमीच तयार ठेवला आणि अण्णांच्या मांडीला मांडी लावून त्या बी प्लॅनचीही अंमलबजावणी केली. ही वस्तुस्थिती सांगणारी ती बातमी व्हायरल होत असताना महाराष्ट्रात आश्‍चर्याचे धक्के बसू लागले. अण्णांचे शारीरीक आणि मानसिक वय लक्षात घेता प्रत्येक डावपेच त्यांच्या लक्षात येईलच हे सांगणे तसे अवघड. नेमका तोच फायदा घेऊन अण्णांची दिशाभूल करण्याचे काम या मंडळींनी केले आणि करीत आहेत. ही बाब अण्णांच्या अजूनही ध्यानात येत नाही. 
अण्णांच्या आंदोलन सहभागी झालेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखविले जात आहे. ही व्यक्ती एका विशिष्ट विचारसरणीशी इमानदार असून अण्णांचे आंदोलन कमकुवत करण्याच्या हेतूने अण्णांसोबत वावरत आहे असा आरोप होतो आहे. या व्यक्तीची पुर्वपिठीका ज्यांना ठाऊक आहे त्यांना या बातमीचे आश्‍चर्य वाटत नाही. मराठा आणि ब्राम्हण या दोन समाजाशी नाते संबंध असणारी ही व्यक्ती शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर झालेल्या आंदोलनातही फुट पाडण्यात यशस्वी ठरली आहे. कुठल्या तरी एनजीओच्या नावावर पश्‍चिम महाराष्ट्रात केलेल्या एखाद दुसर्‍या फुटकळ कामाचे भांडवल करून आपण शेतकर्‍यांचे एकमेव कैवारी आहोत असा आभास निर्माण करीत शेतकरी सुकाणू समितीचे नाशिक व्यासपीठावर गोंधळ घालण्याचा पराक्रम करणार्‍या या व्यक्तीने अण्णांच्या आंदोलनात नोंदविलेला सहभाग म्हणूनच वादात सापडला आहे. अण्णा गांधीवादी आहेत. या गांधीवादाला स्मरत अण्णांनी या व्यक्तीवर आरोप करणार्‍या मंडळींवर त्रागा करण्याऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. अण्णांचा वापर होतो आहे हे वास्तव अण्णांनी आणि अण्णा समर्थकांनी समजून घ्यायला हवे. अन्यथा अण्णांसह त्यांचे आंदोलन भरकटलेल्या तारूसारखे किनार्‍याला लागण्याऐवजी बदनामच होत राहील.