पुणे, दि. 30, एप्रिल - हद्दीत समाविष्ट 11 गावांमधील मिळकतींची कर आकारणी महापालिकेच्या दरांप्रमाणे करण्यास मुख्यसभेने मान्यता दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव प्रशासनाने महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. ती मिळताच या गावांची कर आकारणी निश्चित करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
पालिकेत समाविष्ट झालेल्या या 11 गावांमधील तब्बल 1 लाख 20 हजार मिळकतींच्या नोंदी संबंधित ग्रामपंचायतींच्या दप्तरांमध्ये आहेत. त्या आधारावर ही कर आकारणी केली जाणार असल्याचे महापालिका कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी सांगितले. ही गावे महापालिकेत ऑक्टोबर 2017 मध्ये आली होती. तर ही गावे येण्यापूर्वी ग्रामपंचायतीने गावांमध्ये मिळकतकर बिलांचे वाटप केले होते. त्यानुसार, मागील वर्षाची बिले ग्रामपंचायतीच्या दराने होती. मात्र, आता या वर्षापासून ही बिले महापालिकेच्या दरानुसार दिली जाणार आहेत.