Breaking News

बचत गटांच्या महिलांनी आता मोठ्या उद्योग क्षेत्रात यावे : गवळी


केवळ पारंपरिक पद्धतीने व्यवसाय न करता आता स्वयंसहायता गटांनी उद्योगांच्या विविध प्रकारात पावले टाकली पाहिजेत. योग्य प्रशिक्षणामुळे बचत गटाच्या महिला उद्योग व्यवसायात निश्‍चित यश संपादन करतील, असा आत्मविश्‍वास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी व्यक्त केला.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अहमदनगर जिल्हा कार्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिला प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कृषी विभागाचे सहाय्यक प्रकल्प संचालक शिरीष जाधव, माविमचे विभागीय नियंत्रण व मूल्यमापन अधिकारी संदीप मराठे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अनिल परदेशी, महापालिकेतील सहायक प्रकल्प व्यवस्थापक नानासाहेब बेल्हेकर, आयसीआयसीआयचे जिल्हा व्यवस्थापक निखील काकडे, आणि माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गवळी आणि मान्यवरांच्या हस्ते विविध स्वयंसहायता महिला गटांच्या प्रतिनिधींचा तसेच सन 2017-18 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या गटांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 25 हजार रूपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.गवळी म्हणाले, महिलांनी उद्योगासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे. छोट्या-छोट्या व्यवसायातून खंबीरपणे पावले पुढे टाकणार्‍या महिलांनी ग्रामीण भागातील गरज ओळखून उद्योगिनी म्हणून नाव कमवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून स्वयंसहायता गटांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

जाधव यांनी, महिला अतिशय आत्मविश्‍वासाने या क्षेत्रात वावरत असल्याचे सांगून सामाजिक घटनांविषयीची बांधीलकीही या स्वयंसहायता गटांनी जपली पाहिजे, असे सांगितले. यावेळी परदेशी यांनी, स्वयंसहायता गटाच्या महिला या बँकव्यवहाराविषयी आता जागरुक झाल्या आहेत. आर्थिक सबलीकरण, आत्मविश्‍वास आणि स्वावलंबन या गोष्टी त्यांनी या माध्यमातून साध्य केल्याचे ते म्हणाले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध उपक्रमातून महिलांनी आर्थिक आधार बळकट करीत स्वावलंबी आणि आत्मविश्‍वासाचा नवा मार्ग शोधल्याचे चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अभय महाजन हे महिलांसाठीच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत. त्यामुळेच विविध विभागांच्या महिलांसाठीच्या योजना संबंधित महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी त्यांचा आग्रह असतो, असे चव्हाण यांनी नमूद केले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात गायकवाड यांनी माविमच्या जिल्हा कार्यालयाने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक स्वयंसहागट गट माविमच्या माध्यमातून कार्यरत असून त्याद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील 30 हजार महिलांना जोडले गेले आहे. यापैकी 1 हजार 433 स्वयंसहायता गटाला अ वर्ग मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. माविमने विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून घरांवर पती-पत्नी या दोघांचीही नावे असावीत, असा उपक्रम राबविण्यात आला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील माविमच्या सहयोगिनींना शेळीपालन आणि त्यांची निगा व प्रथमोपचारांबाबत प्रशिक्षित करण्यात आले. त्याचा लाभ या सहयोगिनी विविध गावातील शेळीपालक महिलांना करुन देत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.