Breaking News

‘प्रवरा’ची वैद्यकीय संशोधन परिषद तरुणांना दिशादायी : निकम


कोर्टातील गुन्हेगारी स्वरूपाच्या केसमधील साक्षी पुराव्यात मानवनिर्मित खोटी अथवा चुकीची येऊ शकते. परंतु साक्षी पुराव्यांना पुष्टी देण्यासाठी न्याय वैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे २६/११ किंवा कोपर्डीसारख्या घटनांमध्ये न्याय देऊ शकलो, असे सांगताना प्रवरा अभिमत विद्यापीठाने आयोजित केलेली वैद्यकीय संशोधन परिषद देशातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होणाऱ्या तरुणांना दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले.
प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचनालय आणि ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील लेक्चर हॉलमधील सिंधू, सरस्वती आणि गोदावरी हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘इन्वेंटम २०१८’ वैद्यकीय संशोधन परिषदेचे उदघाटन पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्रो. कुलपती डॉ. राजेंद्र विखे, कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज, दंत महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एन. जंगले आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. राहुल कुंकूलोळ यांनी प्रास्तविक केले. शर्वरी वैद्य यांनी स्वागत केले.

तीन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रामध्ये वैज्ञानिक शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत. दि. ३० मार्च रोजी वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील नामांकित वक्ते डॉ. करी रामा रेड्डी, डॉ. विजय दहिफळे, डॉ. अजय कोठारी, डॉ. राजेश्वरी व्होरा, डॉ. जगदीश चतुर्वेदी, आणि डॉ. पुनम गोयल आदी मार्गदर्शन करणार आहेत. तर दि. ३ मार्च रोजी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत कौशल्य, आर्थोपेडिक प्लास्टर, कास्ट अप्लिकेशन, ऍनेस्थेशिया कार्यशाळा, डॉक्टर व रुग्ण संबंधी याविषयी चर्चा होणार आहे.

निकम म्हणाले, न्याय वैद्यकशाश्त्र (फॉरेन्सिक सायन्स) हे कोर्टाच्या कुठल्याही केससाठी पुरावा म्हणून महत्वाचा दुआ ठरू शकते. भूतकाळात घडलेल्या घटनेची खरी माहिती फॉरेन्सिक सायन्सच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने निवड करण्यासाठी या शास्त्राची खूप मोठी मदत होत आहे. तसेच खुनासारख्या घटनेतील शवविच्छेदनातून अनेक बारीक सारीक गोष्टींची उकल होत असल्याने आरोपीला शिक्षेच्या पिंजऱ्यामध्ये उभे करता येऊ शकते. म्हणूनच फॉरेन्सिक सायन्स, वैद्यकीय सायन्स, माहिती तंत्रज्ञान ( जी. पी. एस. ) ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम मधील प्रगत ज्ञान वैद्यकीय क्षेत्रातील भारतीय तरुणांना अशा सेमिनारमधून नक्कीच मिळेल. 

या परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या शोधनिबंधासाठी पारितोषिक देण्यात येणार आहे. या अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पदवी घेण्यापूर्वीच गेल्या चार वर्षांत ७७ वैद्यकीय संशोधन पूर्ण केल्याने त्यांना आयसीएमआर या संस्थेने शिष्यवृत्ती देऊन गौरविले. दोनशेपेक्षा जास्त विषयांवर डॉक्टरांकडून वैद्यकीय शोधनिबंधासाठी काम सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले.